पोखरण : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने राजस्थानमधील पोखरण फील्ड फायरिंंग रेंज येथे स्वदेशी मॅन-पोर्टेबल अँटी-टँक गाईडेड मिसाईलची यशस्वी चाचणी केली. त्याचा व्हीडीओही समोर आला आहे. हे क्षेपणास्त्र शत्रूच्या टाक्या आणि चिलखती वाहने नष्ट करू शकते. या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारतीय लष्कराला आणखी बळ मिळणार आहे.
डीआरडीओने संशोधन आणि प्रक्षेपण केलेले हे क्षेपणास्त्र भविष्यात अर्जुन या मुख्य बॅटल टँकमध्येही तैनात केले जाईल. पोखरण चाचणीत एमपीएटीजीएमने पूर्ण अचूकतेने लक्ष्य गाठले. हे स्वदेशी अँटी-टँक क्षेपणास्त्र टॅन्डम हाय एक्सप्लोसिव्ह अँटी-टँक शस्त्राने सुसज्ज आहे. जे अत्याधुनिक स्फोटके, प्रतिक्रियात्मक आर्मर चिलखत असलेल्या चिलखती वाहनांना भेदू शकते. याचा अर्थ आजच्या काळातील कोणतेही रणगाडे किंवा चिलखती वाहन या क्षेपणास्त्राच्या नजरेतून सुटू शकत नाही.
फायरसाठी दोघांची आवश्यकता
मॅन-पोर्टेबल अँटी-टँक गाईडेड क्षेपणास्त्राच्या अनेक चाचण्या झाल्या आहेत. या क्षेपणास्त्राचे वजन १४.५० किलो आहे. त्याची लांबी ४.३ फूट आहे. त्याला फायर करण्यासाठी दोन लोकांची आवश्यकता आहे. त्याची रेंज २०० मीटर ते २.५० किमी आहे. टँडम चार्ज हीट आणि पेनिट्रेशन वॉरहेड्स त्यात बसवता येतात. हे क्षेपणास्त्र सैन्यात सामील झाल्यानंतर, भारतीय लष्करातील फ्रान्सचे मिलान-२ टी आणि रशियाचे कॉन्कर्स अँटी-टँक गाइडेड या जुन्या आवृत्त्या काढून टाकल्या जातील, असेही लष्कराने स्पष्ट केले आहे.