21.2 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeमहाराष्ट्रसुदर्शन घुले वाल्मीक कराडचा बॉस?

सुदर्शन घुले वाल्मीक कराडचा बॉस?

सुदर्शन घुलेच गँगचा खरा मास्टरमाइंड? सीआडीचा तपासात अजब खुलासा

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांनी ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. सुदर्शन घुले याने पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती. यात संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केला होता. यातूनच सुदर्शन घुलेसह इतर आरोपींनी संतोष देशमुखांचे अपहरण करून त्यांचा जीव घेतला.

या हत्येत सुदर्शन घुलेचा प्रत्यक्ष सहभाग असला तरी या गुन्ह्यामुळे वाल्मीक कराडच खरा मास्टरमाइंड असल्याचा आरोप सुरुवातीपासून होत आहे. वाल्मीक कराडला अटक करावी, यासाठी राज्यभरात मोठमोठी आंदोलनं देखील झाली. अलीकडेच वाल्मीक कराडला अटक करून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या सगळया प्रकरणाचा खरा सूत्रधार वाल्मीक कराड हाच असल्याचा आरोप सुरुवातीपासून होत आहे. पण सीआयडीच्या तपासात वेगळाच खुलासा समोर आला आहे.

घुलेला दाखविले लीडर
सीआयडीने संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले याला गँगचा लीडर दाखवले आहे, तर वाल्मीक कराड हा सुदर्शन घुलेच्या गँगचा सदस्य असल्याचं म्हटले आहे. सीआयडीच्या या खुलाशानंतर वाल्मीक कराड नव्हे तर सुदर्शन घुले हाच खरा मास्टरमाइंड असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असू शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तपास केला जात आहे.

कराड घुले गँगचा सदस्य
दुसरीकडे, सीआयडीने संतोष देशमुख खून प्रकरणात सुदर्शन घुले याला गँगचा लीडर आणि वाल्मीक कराडला गँगचा सदस्य असल्याचे म्हटल्यानंतर सीआयडीमध्ये देखील मोठे बदल करण्यात आले आहेत. सीआयडीचे तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर करीत होते. पण आता त्यांच्या जागी अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील हे या प्रकरणाचा तपास करणार आहेत. सीआयडीमध्ये अचानक मोठे बदल केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR