बीड : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तीन आरोपी अजूनही फरार आहेत. हत्येचा मास्टरमाईंड म्हटला जाणारा वाल्मिक कराड याने सीआयडीसमोर शरणागती पत्करली आहे. मात्र त्याच्यावर हत्येचा गुन्हा नाही. वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणातील आरोपी आहे. त्याला १४ दिवसांची सीआयडी कोठडी काल सुनावण्यात आली. आता उर्वरित तीन आरोपींचा शोध गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) घेत आहे. सीआयडीच्या रडारवर आता सुदर्शन घुले आहे.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आहे. सुदर्शन घुले अजून फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवसापासून तो आणि त्याचे दोन साथीदार फरार आहेत. वाल्मिक कराड शरण आल्यानंतर आता सीआयडीने त्यांचा मोर्चा फरार सुदर्शन घुलेकडे वळवला आहे. सुदर्शन घुले ताब्यात आला तर हत्या प्रकरणातील अनेक पदर उलगडले जाणार आहेत. हत्या कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली, हत्येनंतर कोणाला निरोप दिला गेला, हे सर्व उघड होण्याची शक्यता आहे. सीआयडी आता सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांचा शोध घेत आहे.
वाल्मिक कराड याचे शेवटचे मोबाईल लोकेशन हे पुण्यात मिळाले होते. त्याने पुण्यातच आत्मसमर्पण केले. त्यामुळे सुदर्शन घुले देखील महाराष्ट्रातच असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर त्याचे दोन साथीदार महाराष्ट्राबाहेर गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या शोधासाठी सीआयडीचे पथक रवाना झाले आहेत.
पोलिसांच्या कारवाईवर विरोधकांना शंका
वाल्मिक कराड याच्या आत्मसमर्पणामुळे पोलिस आणि सीआयडीच्या तपासावर शंका उपस्थित होत आहे. पोलिस आणि सीआयडीला आरोपींचा शोध घेता आलेला नाही, अशी टीका विरोधकांनी केली आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी कराडच्या आत्मसमर्पणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.