21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रदेशात कट्टरतावादाच्या घटनांमध्ये अचानक वाढ

देशात कट्टरतावादाच्या घटनांमध्ये अचानक वाढ

सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शनिवारी ९९ वर्ष पूर्ण झाले व संघाने शताब्दी वर्षात पदार्पण केले. रेशीमबाग येथे शनिवारी विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे नागपुरात पाऊस असूनदेखील चिखल व पावसात हे आयोजन झाले. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देशात जातीपातीच्या आधारावर निर्माण होत असलेले भेद व त्यामाध्यमातून अराजकता पसरविण्याच्या प्रयत्न चिंता व्यक्त केली.

या कार्यक्रमाला इस्त्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आज भारतात सर्वत्र मूल्यांचा -हास आणि भेदभाव करणा-या घटकांच्या समाज तोडण्याच्या खेळी दिसत आहेत. जात, भाषा, प्रदेश इत्यादी छोट्या वैशिष्ट्यांच्या आधारे सामान्य समाजाला वेगळे करून संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे आज देशाच्या वायव्य सीमेला लागून असलेल्या पंजाब, जम्मू-काश्मीर, लडाख; सागरी सीमाक्षेत्रातील केरळ, तामिळनाडू आणि बिहारपासून मणिपूरपर्यंत संपूर्ण पूर्वांचल अस्वस्थ आहे.

देशात विनाकारण कट्टरतावादाला चिथावणी देणा-या घटनांमध्येही अचानक वाढ होताना दिसते आहे. परिस्थिती किंवा धोरणांबद्दल असंतोष असू शकतो, परंतु ते व्यक्त करण्याचे आणि विरोध करण्याचे लोकशाही मार्ग आहेत. त्यांचे पालन न करता हिंसाचार करणे, समाजातील एखाद्या विशिष्ट वर्गावर हल्ला करणे, विनाकारण हिंसाचार करणे, भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, ही गुंडगिरी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशा वागण्याला ‘अराजकतेचे असे म्हटले आहे, याकडे सरसंघचालकांनी लक्ष वेधले. यावेळी स्वयंसेवकांनी विविध शारीरिक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.

देशाची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न
देशाने कोट्यवधी जनतेच्या आशा आकांक्षांच्या पुर्ततेसाठी गती पकडली आहे. मागील काही वर्षांमध्ये जगात भारताचा दबदबा वाढला आहे व एक सशक्त देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे. तरुणाईमध्ये स्व ची भावना वाढीस लागली आहे. देशात तरुण, महिला, उद्योजक, शेतकरी, कामगार, जवान, प्रशासन इत्यादी क्षेत्रांत मौलिक कार्य झाले आहेत. मात्र काही तत्त्व षडयंत्र रचून यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाच्या चारही बाजुंना अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशाची प्रतिमा मलिन करण्यासाठी जाणुनबुजून षडयंत्र रचण्यात आले आहे. असत्य किंवा अर्धसत्याच्या आधारावर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR