शिरुर अनंतपाळ : प्रतिनिधी
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील सर्व प्रकल्पावरील सिंंचनासाठी सुरू असलेला विद्यूत पुरवठा महावितरणच्या वतीने खंडीत करण्यात येऊन प्रशासनाने सर्व प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे. या सर्व प्रकल्पावरील सिंंचनाद्वारे शेतक-यांनी लागवड केलेला ऊस पाण्याअभावी वाळून जाणार असून प्रकल्पावरील पाणी बंद केल्याने ऊसाचे पीक धोक्यात आल्याने उत्पादक शेतक-यांचीचिंता वाढली आहे.
ऐन उमेदीच्या काळात ऊसाला पाणी कमी पडणार असल्याने त्याचे वजन कमी होणार असल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडणार आहेत. प्रकल्पाचे पाणी बंद केल्याने तालुक्यातील ऊसाचा प्रश्न गंभीर बनला असून याचा सर्वाधिक फटका प्रकल्पा शेजारील शेतक-यांना बसणार असून अशात अडचणीत सापडलेल्या शेतक-यांंना दिलासा देण्याची गरज आहे. दरम्यान प्रकल्पाचा तालुका अशी ओळख असलेल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यात गेल्या दोन वर्षात चांगला पाऊस झाल्याने शेतक-यानी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली. मात्र यंदा कमी पावसामुळे प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने प्रशासनाकडून पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले परिणामी मोठ्या कष्टाने पिकविलेला ऊस पाण्याअभावी वाळण्याची भिती निर्माण झाली आहे. दरम्यान तालुक्यातील सर्व प्रकल्पावरील विद्यूत पुरवठा खंडीत करण्यात आला असून ऊस वाळून जाईल,या भितीने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.