25.1 C
Latur
Monday, October 21, 2024
Homeमहाराष्ट्रऊसतोड कामगार संघटना ५ जागा लढविणार

ऊसतोड कामगार संघटना ५ जागा लढविणार

बीड : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून राज्यात निवडणुकीचा रणसंग्राम पहायला मिळत आहे. बीडमधून भाजपा आणि पंकजा मुंडे यांना ऊसतोड कामगार संघटनांनी थेट आव्हान दिले आहे. ऊसतोड कामगारांच्या ९ संघटनांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केलीय. याच अनुषंगाने बीडमध्ये संघटनांनी बैठक बोलावली होती. या बैठकीतून राज्यातील सहा जागांवर दावा करत लढणार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आता भाजपची उमेदवारांची यादी आली आहे. यात बीड जिल्ह्याचा फॉर्म्युला समोर आला आहे. दरम्यान, राज्यातील ९ ऊसतोड कामगार संघटनांची बैठक पार पडली असून राज्यातील पाच जागा लढविणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यामध्ये २२ लाख ऊसतोड कामगार आहेत. त्यातील एकट्या बीड जिल्ह्यात चार लाख ८५ हजार मजूर आहेत. त्यांचे नेतृत्व आजपर्यंत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून होत होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी या ऊसतोड कामगारांचे नेतृत्व केले. परंतु आता सत्तेत वाटा मिळावा म्हणून ऊसतोड कामगार संघटनांनी बंड पुकारत राज्यातील पाच जागांवर दावा केला आहे.

ऊसतोड कामगार संघटनांचा समावेश
बीड, आष्टी, चाळीसगाव, कन्नड आणि माजलगाव या विधानसभा मतदारसंघांत उमेदवार उभे केले जाणार आहेत. याबाबत महायुती आणि महाविकास आघाडीकडे बोलणी झाली असून यांच्याकडून उमेदवारी न मिळाल्यास या मतदारसंघात अपक्ष लढण्याची तयारी ऊसतोड कामगार संघटनांनी केली आहे. यात ९ ऊसतोड कामगार संघटनांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार
बीड जिल्ह्यात महायुतीकडून दोन जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील आणि चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार असतील. बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघ आणि केज विधानसभा मतदारसंघामधून भाजपचे उमेदवार महायुतीकडून निवडणूक लढवतील. तर, अजित पवार गटाकडून बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे चार उमेदवार असतील. माजलगाव विधानसभा मतदारसंघ, गेवराई विधानसभा मतदारसंघ, परळी विधानसभा मतदारसंघ आणि बीड विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी अजित पवार गटाचे उमेदवार पाहायला मिळतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR