सोलापूर : राज्य शासनाने मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही गौरी गणपती उत्सव काळात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अवघ्या शंभर रुपयांत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा रेशन दुकानातून होणार आहे. शासन निर्णयाचे शिधापत्रिकाधारकांकडून स्वागत होत आहे.
दरम्यान, १५ ऑगस्टपासून आनंदाचा शिधा शिधावाटप करण्याचे आदेश आहेत. १५ सप्टेंबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागेल. मागच्या वर्षी आनंदाचा शिधा उशिरा मिळाला. यामुळे वाटपदेखील उशिरा झाले.यंदा किमान असे होऊ नये. नियोजित वेळेत शिधा किट मिळाल्यास लाभार्थीनाही उत्सवापूर्वी किट देता येईल, अशी माहिती जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे संपर्कप्रमुख नितीन पेंटर यांनी दिली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील साखर, रवा, चनाडाळ प्रत्येकी एक किलो आणि खाद्यतेल एक लिटर असे चार शिधा जिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा १ लाख १४ हजार ७०३ लाभार्थ्यांना दिला गेला. मागच्या वर्षी गौरी गणपतीनिमित्त १ लाख १४ हजार लाभार्थ्यांना तसेच दिवाळी सणानिमित्त १ लाख १७ हजार लाभार्थ्यांना प्रति संच १०० रुपये दराने वितरित केला गेला.
अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना यापूर्वी गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देण्यात आला. शासनाने अशा विविध सणांच्या अनुषंगाने आनंदाचा शिधा गोरगरीब लाभार्थ्यांना वाटप करून त्यांचा सण आनंदी करण्याचा प्रयत्न केला आहे. मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही आगामी गौरी-गणपती उत्सव काळात शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सवही ख-या अर्थाने आनंदाचा होईल अशा प्रतिक्रिया शिधापत्रिकाधारकांमधून उमटत आहेत.