नवी दिल्ली : वृत्तसंस्था
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापूसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव ३१ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ८५ वर्षीय आसाराम बापूला सुटकेनंतर आपल्या अनुयायांना भेटू नये, असे निर्देश दिले आहेत. बापूंवर सध्या जोधपूरच्या आरोग्य मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू असून तो जोधपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.
दरम्यान, आसाराम बापूला यापूर्वीही उपचारासाठी खोपोलीत दाखल केले होते. खोपोलीतील एका आयुर्वेदिक रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. या दरम्यान चोख सुरक्षा व्यवस्थेत आसाराम बापूला खोपोलीत दाखल करण्यात आले होते. अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला राजस्थान उच्च न्यायालयाने आता देखील दिलासा देत उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. वैद्यकीय कारणासाठी आसारामला ३१ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
मागील काही दिवसांपासून आसाराम बापूला हृदयविकाराचा त्रास होत होता. जामिनाच्या कालावधीत देखरेखीसाठी सुरक्षा कर्मचारी तैनात करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवून आश्रमात एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याच्या आश्रमात एका महिला शिष्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याबद्दल त्याला गुजरात न्यायालयाने दोषी ठरवले होते. ८५ वर्षीय आसाराम बापू हा २०१३ पासून जोधपूर तुरुंगात बंद आहे.