नवी दिल्ली : प्रतिनिधी
नीट परिक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या अनुषंगाने देशभरातील न्यायालयांमध्ये ज्या याचिका दाखल झाल्या आहेत, त्या सर्वोच्च न्यायालयात वर्ग केल्या जाव्यात, अशी विनंती नीट परिक्षेचे आयोजन करणा-या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) केली आहे. दरम्यान, गोध्रा येथील परिक्षा केंद्र मिळविण्यासाठी १० लाख रूपयांपर्यंतची लाच देण्यात आली. पेपर लिक करणा-या टोळीने सुमारे३० ते ३२ लाख रूपये घेतले असून १२ आरोपींना अटक करण्यात आली. या सा-या गैरप्रकाराची सीबीआयमार्फत चौकशी करण्यासंदर्भातील याचिका दाखल झाली. त्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने एनटीए तसेच याचिकाकर्त्यांना नोटीस बजावली आहे. सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी ८ जुलै रोजी घेतली जाणार आहे.
गैरप्रकाराची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश देण्याच्या विनंती याचिकेवर दोन आठवड्यात उत्तर सादर करावे, असे निर्देश न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने ‘एनटीए’ ला दिले. जुलै महिन्यात नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन घेतले जाणार आहे. या समुपदेशनाला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला.
झारखंड, गुजरात आणि ओडिशामधील असंख्य विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा देण्यासाठी गुजरातमधील गोधरा हे केंद्र निवडले होते. गोधरा येथील जय जलाराम नावाच्या शाळेत केंद्र यावे, यासाठी काहीजणांनी १० लाख रुपयांपर्यंतची लाच दिली होती. यातून परिक्षेत घोटाळा झाल्याचे स्पष्ट होते, असा युक्तिवाद एका याचिकेत करण्यात आला होता. दरम्यान, नीट परिक्षेतील कथित गैरप्रकाराच्या विरोधात दिल्लीसह देशाच्या विविध भागात विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन चालवले आहे.
कोट्यवधीचा घोटाळा
बिहारच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावरून असे दिसून आले आहे की, पेपर लिक करणा-या टोळीने परिक्षार्थ्यांकडून ३० ते ३२ लाख रुपये घेतले, उमेदवारांना सेफहाऊसमध्ये उत्तर देण्यास सांगितले गेले, तेथून त्यांना एस्कॉर्टसह थेट परीक्षा केंद्रांवर पाठवले गेले. पेपर लीकचे हे रॅकेट अनेक कोटींचे असल्याचा पोलिसांना संशय असून, सध्या १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पेपरफुटीवर ‘एनटीए’चे मौन
प्रश्नपत्रिकांच्या फुटीत सहभागी असलेल्या एजन्सींच्या कर्मचा-यांनी वाहतुकीदरम्यान पेपर लीक केले आहेत. ‘एनटीए’च्याच कर्मचा-यांनी पेपर लिक केल्याची शक्यता बळावत चालली आहे. बिहार पोलिसांना जळालेल्या लीक झालेल्या प्रश्नपत्रिकाही सापडल्या आहेत, याबाबत अद्याप एनटीएने काहीही पुष्टी केलेली नाही.