खडकवासला : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई-मॅगझीन यांच्या वतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला.
दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात तेलंगणाच्या राज्यपाल तसेच पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल डॉ. तमिलीसाई सौंदरराजन आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या हस्ते सुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
खासदार सुप्रिया सुळे या संसदेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असून गत १६ व्या आणि विद्यमान १७ व्या लोकसभेतही त्यांची कामगिरी सर्वोत्तम अशीच राहिली आहे. त्यांनी चालू लोकसभेच्या कामकाजात एकूण ९३ टक्के उपस्थिती लावत २४८ चर्चांमध्ये सहभाग घेतला. तब्बल ६२९ प्रश्न त्यांनी उपस्थित केले, इतकेच नाही, तर १६ खासगी विधेयकेही त्यांनी संसदेत सादर केली आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीही त्यांना सर्वोत्तम कामगिरीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्कार स्वीकारताना खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील प्रत्येक मतदाराचा हा सन्मान असल्याची भावना व्यक्त करत मतदार संघातील जनतेला पुरस्कार अर्पण करत असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, हा पुरस्कार माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघासह माझ्यावर विश्वास ठेवणा-या प्रत्येकाचा आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी ज्या विश्वासाने मला लोकसभेवर निवडून पाठविले. त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे. जनतेचे प्रेम, आपुलकी आणि विश्वास यामुळेच हा पुरस्कार शक्य झाला आहे. म्हणूनच हा बहुमान माझ्या मतदारसंघातील जनतेला अर्पण करताना मला अतिशय आनंद होत आहे.