22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeसोलापूरमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर सर्वेक्षण पथक कार्यरत

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर सर्वेक्षण पथक कार्यरत

मंद्रुप – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील सोलापूर विजयपूर महामार्गावरील टाकळी येथे व भीमा नदीकाठावरील सादेपूर, भंडारकवठे बंधाऱ्यावरून कर्नाटक राज्यातून येणाऱ्या सर्व वाहनांची रात्रंदिवस कसून तपासणी करण्यात येत आहे.

आदर्श आचार संहितेअंतर्गत रोख रक्कम, मद्य, गुटखा व इतर परवाना नसलेली साहित्यांची स्थिर सर्वेक्षण पथकांतर्गत कसून तपासणी करण्यात येत आहे. मंद्रुप पोलीस ठाणेच्या हद्दीत टाकळी, सादेपूर व भंडारकवठे येथे मंद्रुप पोलीसांच्या सहायाने स्थिर सर्वेक्षण पथक स्थापन करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेले टाकळी येथे भीमा नदीवरील पूलाशेजारी तात्पुरत्या शेडमधून कर्नाटकातून महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या प्रवाशी वाहतूक वाहन टमटम, टेम्पो, जीप, कार यासह सर्व खासगी वाहनांची कसून तपासणी करून व तपासणी छायाचित्रीकरण करून नोंदवहीत वाहन क्रमांक नोंद करण्यात येत आहे. संशयास्पद वाहनांची कसून तपासणी व चित्रीकरण करण्यात येत आहे.

कृषी सहायक, महसूल कर्मचारी, दोन पोलीस अधिकारी, एक निरीक्षक, एक हवालदार, एक कॅमेरामन असे पथक दोन टप्यांमध्ये वाहनांची तपासणी काम करीत आहे. सोलापूर विजयपूर महामार्ग रस्ता असल्याने वाहन तपासणीला वेळ लागत असल्याने वाहनांची गर्दी दिसुन येते. त्यांना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी वाहनातून येणारी अवैध दारू, ५० हजाराहून अधिक रोख रक्कम, कागदोपत्री नसलेली मौल्यवान वस्तू व अवैध शस्त्रे तपासण्याचे आदेश दिले असून जनता सहकार्य करत आहे. वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी भेट देऊन पाहणी करीत आहे. कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरते शेड उभारण्यात आले आहे.

तपासणी पथकासाठी भोजन व पाण्याची सोय नसल्याचे सांगण्यात आले. निवडणूक शाखेकडून कर्मचाऱ्यांसाठी सोईसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. टाकळी येथे स्थिर सर्वेक्षण पथकात प्रभाकर जाधव, व्ही. बी. गायकवाड हे पथकप्रमुक दयानंद साळुंखे व आर. पी. साळी से सहायक पथकप्रमुख काम करीत आहेत. प्रत्येक आठवडयाला तपासणी पथक बदल होते. सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत दोनशे ते अडीचशे तर रात्री आठ ते सकाळी आठ पर्यंत दीडशे वाहनांची तपासणी होत असल्याचे तपासणी पथकाने सांगितले. मंद्रुप पोलीस ठाणेचे सहायक फौजदार श्रीमंत जाधव, हेड कॉन्स्टेबल बजरंग जाधव, बापू गायकवाड व पोलीस शिपाई संजय कांबळे यांच्यासह तालुका पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी कांबळे, विजापूर नाका पोलीस ठाणेचे पोलीस कर्मचारी तपासणी पथकात कार्यरत आहेत.

कर्नाटक राज्यातून येणाऱ्या वाहनांमध्ये आचारसंहीतेचे उल्लंघन करून रोख रक्कम, दारू, गुटखा व अवैध वाहतूक होत असल्याचे आढळून आल्यास दक्षिण सोलापूरच्या आचारसंहीता कक्षाकडे माहीती दिली जाते. संशयास्पद वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. मात्र अद्यापपर्यंत एकाही वाहनधारकांकडून आचारसंहीतेचे उल्लंघन झाल्याचे आढळले नाही.असे टाकळी स्थिर सर्वेक्षण पथकाचे पथकप्रमुख प्रभाकर जाधव यांनी सांगीतले. मंद्रुप पोलीस ठाणे अंतर्गत सोलापूर विजयपूर महामार्गावरील टाकळी, भीमा नदी बंधाऱ्यावरील सादेपूर व भंडारकवठे येथे वाहनतपासणीसाठी मंद्रुप पोलीस ठाणेतील सहा पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेट देऊन पाहणी केली आहे असे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR