नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि एका वकिलामध्ये तीव्र वाद झाला. सुनावणीदरम्यान वकिलाने सरन्यायाधीशांना म्हटले आपण या खुर्चीवर बसण्यास पात्र नाही. आपल्यात प्रामाणिकपणा नाही.
वकिलाचे म्हणणे ऐकल्यानंतर सरन्यायाधीशांनी त्यांना थांबण्यास सांगितले. ते म्हणाले आम्ही पाहू, आपण थोडी प्रतीक्षा करा. यावर वकिलाने आपण थांबणार नसल्याचे सांगितले. यादरम्यान, न्यायमूर्ती मोहना यांनी वकिलाला असे वक्तव्य करण्यापासून थांबवले, परंतु त्याने ऐकले नाही आणि आपला मुद्दा पुन्हा मांडला. खरेतर, स्वत:विरुद्ध सुरू असलेल्या न्यायालयाच्या अवमाननेच्या एका प्रकरणामुळे वकील नाराज होते. त्यांनी खंडपीठातील न्यायमूर्ती बागची आणि न्यायमूर्ती मोहनांप्रति आदर व्यक्त केला. दरम्यान यापूर्वी ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान ७१ वर्षीय वकील राकेश किशोर यांनी तत्कालीन सीजेआय बी.आर. गवई यांच्या दिशेने बूट फेकला. भगवान विष्णूंच्या मूर्तीशी संबंधित एका प्रकरणात सीजेआय यांच्या टिप्पणीमुळे वकील नाराज असल्याचे सांगण्यात आले. घटनेदरम्यान वकिलाने धार्मिक घोषणाही दिल्या. सुरक्षा कर्मचा-यांनी त्यांना तातडीने कोर्टरूममधून बाहेर काढले. सीजेआय गवई यांनी या घटनेवर संयम दाखवत सुनावणी सुरू ठेवण्यास सांगितले. बार कौन्सिल ऑफ इंडियाने वकिलाला वकिली करण्यापासून निलंबित केले.
वकिलाला न्यायालयाच्या कक्षाबाहेर काढले
कोर्टरूममध्ये उपस्थित वकिलांच्या म्हणण्यानुसार, घटनेनंतर संबंधित वकिलाला न्यायालयाबाहेर काढण्यात आले. न्यायालयात उपस्थित इतर वकिलांनी सीजेआय यांच्याकडे संबंधित वकिलाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली. परिस्थिती बिघडल्याने न्यायालयाच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण म्यूट करण्यात आले.
















