मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीत पक्षशिस्तीचा भंग केल्या प्रकरणी काँग्रेसने सांगली मतदारसंघातील बंडखोर उमेदवार जयश्री मदन पाटील यांच्यावर शनिवारी निलंबनाची कारवाई केली.विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला ४ दिवस शिल्लक असताना ही कारवाई झाली आहे. पाटील यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
काँग्रेसने सांगली विधानसभा मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. पृथ्वीराज पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत जयश्री पाटील यांनी बंड केले. उमेदवारी मागे घ्यावी म्हणून काँग्रेसने जयश्री पाटील यांची मनधरणी केली मात्र त्या निवडणूक लढण्यावार ठाम राहिल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज जयश्री पाटील यांच्यावर कारवाई केली. काँग्रेसने या पूर्वी विधानसभा निवडणुकीतील २८ बंडखोरांवर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.