नागपूर : कल्याणमध्ये उच्चभ्रू सोसायटीत मंत्रालयात काम करर्णाया परप्रांतीयाने मराठी भाषिक कुटुंबियांना जबर मारहाण केली. या प्रकरणी मारहाण करणा-या व्यक्ती विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. या प्रकरणाचे पडसाद नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात उमटल्याचे पाहायला मिळाले. यावर विधान परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिलेश शुक्ला याचे निलंबन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
अखिलेश शुक्ला या व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने भांडणामध्ये मराठी माणसाला अपमानित होईल अशा प्रकारचे उद्गार काढले, भांडण काढले, मारामारी केली. त्यातून एक संपाची लाट सर्व लोकांमध्ये तयार झाली आहे. अखिलेश शुक्ला हा एमटीडीसीचा कर्मचारी असून त्याच्या विरोधात एफआयआर नोंद करण्यात आली आहे. त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणात पुढील कारवाई पोलिस करत आहेतय कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचे कारण नाही. मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचा होता, मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच राहिल असे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कधी कधी काही नमुने चुकीचे वक्तव्य करतात. माज दाखवतात. अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. भाजपचे सरकार आले म्हणून हे झाले अशा प्रकारचा राजकीय रंग देण्याचे कारण नव्हते. आता मुंबईमध्ये बसलेला मराठी माणूस हद्दपार का झाला याचाही विचार करावा लागेल. मुंबईतला माणूस ३०० स्क्वेअर फुटच्या घरात बसलेला आहे आणि मोठ्या मोठ्या घरांमध्ये कोण राहत आहे. मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे आणि त्यामध्ये देशभरातून लोक येतात. तीन पिढ्यांपासून उत्तर प्रदेशातून मुंबईत आलेला व्यक्ती तुमच्या माझ्यासारखी उत्तम मराठी बोलतो. मात्र काही माजोरडे लोक अशा पद्धतीने बोलतात त्यामुळे गालबोट लागते असेही फडणवीस म्हणाले.
मराठी माणसाचा आवाज म्हणून मी ठणकावून सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही. प्रत्येकाला काय खायचे याचा अधिकार आणि स्वातंत्र्य संविधानाने दिलेला आहे. एखाद्या समाजाला शाकाहार महत्त्वाचा वाटतो तर तो समाज निश्चितपणे शाकाहारी संघटन तयार करू शकतो. पण पण घर नाकारणे अशा प्रकारचा अधिकार कोणाला नाही. आम्ही मराठी आहोत आणि आमच्या मराठीच्या अभिमानावर कोणी घाला घालत असेल तर त्याच्यावर निश्चितपणे कडक कारवाई केली जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.