जयपूर : छत्तीसगड आणि मध्य प्रदेशानंतर राजस्थानलाही मंगळवारी नवे मुख्यमंत्री मिळाले. जयपूर येथे झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच दिया कुमारी, प्रेमचंद भैरव यांना उपमुख्यमंत्री तर वासुदेव देवनानी यांना विधानसभा अध्यक्ष बनवण्यात आले आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये १५ डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर भजनलाल शर्मा यांनी राजभवन गाठून राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. यासोबतच शपथविधीची तारीखही समोर आली आहे. राजस्थानमध्ये १५ डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजप शासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर भजनलाल शर्मा यांनी मंगळवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानचा सर्वांगीण विकास केला जाईल. राज्याचा सर्वांगीण विकास केला जाईल. मला खात्री द्यायची आहे की राजस्थानचा सर्वांगीण विकास आम्ही नक्कीच पूर्ण करू. मी तुम्हाला याबाबत खात्री देतो, असे ते म्हणाले. भजनलाल शर्मा हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांनी राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित शर्मा जयपूरच्या सांगानेर मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत.