33.5 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeसोलापूररेडीमेड प्रचारसाहित्याने टेलरींग व्यवसाय अडचणीत

रेडीमेड प्रचारसाहित्याने टेलरींग व्यवसाय अडचणीत

सोलापूर : निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी टोपी, रूमाल यासह इतर साहित्य लागायचे. हे दिवस टेलरिंग व्यवसायासाठी खूप महत्त्वाचे होते. मात्र आता सारे काही रेडिमेड साहित्य येत असल्याने त्याचा फटका टेलरिंग व्यवसायाला बसला आहे. निवडणुकीसाठी प्रचार साहित्य मुंबईच्या प्रदेश कार्यालयातून पाठविण्यात येत असल्याने स्थानिक टेलर व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

यंदा टेलरकडे निवडणूक काळातील एकही काम नाही. यंदाच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), ठाकरे सेना, वंचित बहुजन आघाडी, एएमआयएम आदी विविध पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार वेगात सुरू आहे. गावभेट दौरा, कॉर्नर सभा, मेळावे, बैठका, चर्चा, जाहीर सभा, मतदारांशी गाठीभेटीवर जास्तीचा भर दिला जात आहे.

रेडिमेड आणि ऑनलाइनमुळे टेलरिंग व्यवसायाला घरघर लागली आहे. या व्यवसायात आता कुटुंब चालविणे अवघड झालेले आहे. त्यामुळे महिलांनी कपडे विक्री तसेच पार्लर यासारखा इतर जोड व्यवसाय सुरू केला आहे. पुरुष मंडळीदेखील मोठ्या नामांकित टेलरकडे रोजंदारीने काम करीत आहेत. प्रचार साहित्य आता रेडिमेड बाहेरूनच येत असल्याने स्थानिकांना रोजगार मिळेनासे झाले आहे.

पूर्वी स्थानिक बाजारपेठेतूनच प्रचार साहित्य खरेदी केले जात होते. मात्र, आता बाहेरूनच साहित्य रेडिमेड स्वरूपात येत असल्याने स्थानिक टेलर व्यावसायिकांना निवडणूक काळातील कामे मिळेनासे झाले आहेत. टेलर व्यवसाय अडचणीत आला असून, भविष्यात टेलर व्यवसाय संपण्याच्या मार्गावर आहे.

प्रचाराचे सर्व रेडिमेड साहित्य पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयातून येत आहे. प्रदेश कार्यालयातून आलेल्या साहित्याला पैसे खर्च करावे लागत नाही. गुजरातमधील सुरत, बडोदा येथील कापड कारखान्यांमध्ये घाऊक पद्धतीने या कपड्यांची निर्मिती कमी दरात होते, तेथून ते साहित्य मुंबईत येते अन् मुंबईतून हे साहित्य प्रत्येक जिल्ह्यात पाठविण्यात येत आहे.राजकीय पक्षांचे रूमाल, झेंडे, टोप्या, मफलर, टी-शर्ट, बॅनर, स्टीकर, मुखवटे, फेसमास्क आदी साहित्य आता रेडिमेड येऊ लागले आहेत. मागील आठवड्यात शहर भाजप कार्यालयात प्रचार साहित्य ट्रकमधून आणण्यात आले. तालुकापातळीवर वाटपही सुरू झाले आहे. तालुकापातळीवरून गावोगावी प्रचारासाठी साहित्य पाठविण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR