नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताचे माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांचा कालावधी १० नोव्हेंबर २०२४ रोजी संपला. त्यानंतर आज भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. संजीव खन्ना यांनी शपथ घेतली. चंद्रचूड यांच्यानंतर संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. त्यांच्या काळात त्यांनी काही ऐतिहासिक आणि महत्त्वाचे निकाल घेतले आहेत.
सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ आजपासून सुरू झाला असला तरी त्यांना धनंजय चंद्रचूड यांच्याप्रमाणे दोन वर्षे मिळणार नसून फक्त सहा महिनेच त्यांना या पदावर राहता येणार आहे. १३ मे २०२५ हा संजीव खन्ना यांच्या सेवेचा शेवटचा दिवस असणार आहे. त्या दिवशी ते निवृत्त होणार असल्याने सरन्यायाधीश म्हणूनदेखील त्यांना फक्त १३ मे पर्यंतच पदावर राहता येणार आहे. परिणामी त्यांना ६ महिनेच या पदावर राहता येणार आहे.
संजीव खन्ना यांचा जन्म १४ मे १९६० रोजी झाला असून सुमारे चार दशकाहून अधिक काळ ते न्यायिक क्षेत्रात काम करत आहेत. १९८३ साली दिल्ली बार कौन्सिलचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालय तीस हजारी कोर्ट नंतर दिल्ली उच्च न्यायालय आणि विविध लवादांमध्ये वकिली केली. घटनात्मक कायदा, कर आकारणी, विविध लवाद, व्यावसायिक कायदे, कंपनी कायदे आणि पर्यावरण कायदे यासारख्या कायद्याच्या अनेक क्षेत्रात त्यांनी यशस्वीरित्या वकिली केली.