आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत बेकायदेशीरपणे सुरू असलेले अवैध्य दोन नंबरचे धंदे पोलिसांनी कारवाई करून तात्काळ बंद करावेत. यासंदर्भात स्वत: वरिष्ठ पोलिस अधिका-यांची विशेष बैठक घेऊन सविस्तर माहिती घेणार आहे. आळंदी शहरात लॉजिंगचाही सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे गैर धंदे करणा-यांची यापुढे गय केली जाणार नाही. चुकीची कामे करणा-यांना टायरमध्ये घ्या आणि ऐकत नसतील तर त्यांच्यावर मोक्का लावा अशा कडक शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना तंबी दिली.
तीर्थक्षेत्र आळंदीसह खेड तालुक्यात आमदार दिलीप मोहिते यांच्या जनसंवाद दौ-यात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, तीर्थक्षेत्र आळंदी हे लाखो वारक-यांचे श्रद्धास्थान आहे. माउलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनाला अनेक भाविक आळंदीत येतात. मात्र याठिकाणी अनेक दिवसांपासून राजेरोसपणे अवैद्य धंदे सुरु असल्याचे स्थानिक महिला भगिनींनी सांगितले. यासंदर्भात संबंधित पोलिस प्रशासनाकडून कायदेशीर पावले उचलली जात नसल्याची खंत व्यक्त केली. आळंदीतील अशी गैरकृत्ये पोलिसांनी तात्काळ बंद करावी. या प्रकारांची स्वत: माहिती घेणार आहे. यावर आळा घालण्यात अपयश आल्यास संबंधित जबाबदार पोलिस अधिका-यांना बडतर्फ करू असे पवार यांनी सांगितले.