राज्यात सध्या घोटाळ्यांची स्पर्धा सुरू आहे. स्पर्धा परीक्षेत घोटाळा, आर्थिक घोटाळा, राजकारणात घोटाळा असे विविध क्षेत्रांतील घोटाळे गाजत आहेत. अशा घोटाळ्यांच्या चक्रव्यूहात आजची तरुणाई अडकली आहे. बेरोजगारीच्या समस्येने ग्रासलेली तरुणाई पोटाची खळगी भरेल या आशेने विविध स्पर्धा परीक्षांना सामोरी जाते परंतु परीक्षेची प्रक्रियाच पूर्ण होत नाही. परीक्षा होण्याआधीच पेपरफुटीचे गंडांतर येते आणि परीक्षार्थींचा अभ्यास, मेहनत वाया जाते. परीक्षा रद्द होतात आणि नव्याने परीक्षा घेतली जाईल अशी घोषणा केली जाते. परीक्षा होत असताना अनेक गैरप्रकार उघडकीस येऊन देखील कोणतीच कारवाई न होता काही परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. त्यामुळे परीक्षार्थींमध्ये असंतोष धुमसतो आहे. तलाठी भरती परीक्षेतही असाच गैरप्रकार घडला. एकूण प्रकाराकडे होणा-या सरकारी दुर्लक्षाच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर आणि बीडमध्ये हजारो परीक्षार्थी रस्त्यावर उतरले. सुरुवातीपासूनच गोंधळात अडकलेल्या तलाठी भरती परीक्षेचा निकालही गोंधळ उडवणाराच होता.
त्याआधी वनरक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अतिशय कमी गुण होते ते विद्यार्थी तलाठी परीक्षेत मात्र अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे समोर आले आहे. हे विद्यार्थी पैकीच्या पैकी नव्हे तर त्यापेक्षाही अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले. काही जणांना २०० पैकी २१४ गुण मिळाले म्हणे! हा काय प्रकार आहे? आधीच्या परीक्षेत नापास झालेले विद्यार्थी तलाठी भरती परीक्षेत सर्वाधिक म्हणजेच एकूण गुणांपेक्षा अधिक गुणांनी पास होतात कसे? या निकालावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने देखील आक्षेप घेतला आहे. तलाठी होण्यासाठी विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागतोय. महसुली व्यवस्थेतील तलाठी पद हे अतिशय महत्त्वाचे पद आहे. ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ असे म्हटले जाते, त्याच धर्तीवर परंतु उपहासाने तलाठी पदाची महती वर्णिताना ‘जे न लिहिले ललाटी ते लिहील तलाठी’ असे म्हटले जाते. सरकारी व्यवस्थेतील या महत्त्वाच्या पदासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे रिक्त पदावर भरती प्रक्रिया पार पाडली गेली. १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान परीक्षा झाली.
या दरम्यान काही परीक्षा केंद्रांवर आधुनिक तंत्राचा वापर करत कॉपी करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत पार पडलेल्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आणि अनेकांचे प्रामाणिकपणे अभ्यास करून तलाठी होण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. विद्यार्थ्यांनी निवड प्रक्रियेवर आक्षेप घेतला. ज्या संस्थेमार्फत परीक्षा घेण्यात आल्या त्या संस्थेच्या कर्मचा-यांनीच तलाठी परीक्षेत उमेदवारांना कॉप्या पुरवल्या म्हणे! पेपरफुटीचा तपास पूर्ण न करताच निकाल जाहीर करणे संतापजनक आहे. या परीक्षेतील वेळोवेळी उघड झालेल्या गैरप्रकारांबाबत समन्वय समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तलाठी भरती घोटाळ्याचा न्यायालयीन एसआयटी नेमून तपास करावा अशी मागणी केली आहे. यावरून तलाठी भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला हे उघड आहे. या आधी झालेली परीक्षा ही महापोर्टलद्वारे घेण्यात आली होती. त्यातही मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पारदर्शकरीत्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी टीसीएसकडे परीक्षांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. पाच तारखेला जाहीर करण्यात आलेल्या निकालात एकाच कुटुंबातील दोन ते तीन विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण मिळाल्याचे आढळून आले. यावर देखील विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे.
याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना काही जणांनी आपले नाव न सांगता प्रतिक्रिया दिल्या आहेत. कारण सरकारविरोधात बोलल्यास आपले नाव ब्लॅकलिस्टमध्ये जाईल अशी त्यांना भीती वाटते. परीक्षेसाठी नऊशे ते हजार रुपये शुल्क ठेवण्यात आले होते. त्याबाबतही काही जणांनी नापसंती व्यक्त केली होती. मात्र शुल्कवाढीचे कारण देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, परीक्षेचे गांभीर्य रहावे म्हणून शुल्कवाढ केली आहे. असे असेल तर भरती प्रक्रिया पारदर्शक होणे अपेक्षित होते. परीक्षेत गैरप्रकार झाले असा आक्षेप असेल तर पुरावे द्या, कारवाई करू असेही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी आपली जबाबदारी झटकणे कितपत योग्य आहे असा परीक्षार्थींचा सवाल आहे. वेळोवेळी गैरप्रकार उघडकीस येऊनही तसेच गुन्हे दाखल झालेले विद्यार्थीच पुन्हा परीक्षा देऊन सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होत असतील तर सा-याच प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे साहजिक आहे. अतिशय प्रतिकूल स्थितीत अभ्यास करून नोकरी मिळेल या आशेवर जगणा-या तरुणाईला वारंवार अपेक्षाभंगाच्या दु:खाला सामोरे जावे लागणे हे दुर्दैवी आहे. कोरोना काळात खासगी कंपन्यांकडून परीक्षा घेण्याचा सरकारचा निर्णय आरोग्य खात्यातील भरतीच्या वेळी वादग्रस्त ठरला.
त्यामुळे ही भरतीच रद्द केली गेली आणि टीसीएस व आयबीपीएस या नामांकित कंपन्यांना हे काम देण्यात आले. टीसीएस ही टाटा समूहातील नामांकित कंपनी तर आयबीपीएसला केंद्र पातळीवरील नोकर भरतीचा दीर्घ अनुभव. त्यामुळे तरुणाईने या निर्णयावर विश्वास ठेवला पण आता त्यालाच तडा जात आहे. टीसीएसच्या कर्मचा-यांनी त्यांच्या नातेवाईकांना या भरतीत कसा फायदा होईल याची काळजी घेतली आणि लातूरमध्ये प्रश्नपत्रिका फोडण्याचे काम केले. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न परीक्षार्थींना पडला आहे. तलाठी भरती प्रक्रियेतील घोटाळा उजेडात आल्यानंतर त्याबाबत कारवाई करण्याचे सोडून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी धमकीवजा विधान केले. यावरून सरकारला घोटाळ्याबाबत काहीच सोयरसुतक नाही असे दिसते. प्रत्येक परीक्षेतील गोंधळाबाबत तरुणाई आक्षेप घेत आहे मात्र, सरकार पेपरफुटीविरुद्ध कठोर कायदा करण्यास तयार नाही असेच दिसते. अलिकडे सर्वच परीक्षांमध्ये गैरप्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्याबाबत सरकारची ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी धारणा बनली असावी!