लातूर : प्रतिनिधी
अमोलने जे काही केले ते बेरोजगारीच्या कारणामुळे केले, त्याने सैन्य भरतीचे ६ वेळा प्रयत्न केले आणि त्याने रनिंगची चॅम्पियनशिपही जिंकली, अशी माहिती अमोल शिंदेच्या पालकांनी दिली. अमोलशी आमचे बोलणे करून द्या अन्यथा आत्महत्या करू, असा इशाराही त्यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिला.
गुणवत्ता असून मुलास नोकरी मिळाली नाही. रोजगार करणा-या लोकांच्या मुलास नोकरी लागत नाही का, असा प्रश्न धनराज शिंदे यांनी उपस्थित केला. मुलाशी बोलणे नाही झाल्यास मी आत्महत्या करणार, अशी भूमिकाही त्यांनी घेतली. बुधवारी संसदेची सुरक्षा भेदून चार युवक आतमध्ये गेले. त्यातील दोघांनी लोकसभेमध्ये जाऊन धूर सोडला. दोन तरुणांनी संसद परिसरात धुमाकूळ घातला. त्यानंतर या चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यातील एक आरोपी अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातल्या झरीचा रहिवासी आहे.
अमोलने दिल्लीला जाण्याआधी विहीर खोदण्याचे काम केले. त्यातून पाच हजार मजुरी मिळवली. दोन हजार उसणे घेतले आणि ते घेवून तो ९ तारखेला दिल्लीसाठी निघाला होता. दोन दिवस मजूर म्हणून काम करून लातूरला गेला. तिथे जाऊन भगतसिंह यांचा फोटो विकत घेतला होता. भगतसिंह आणि इतरांचे फोटो असलेला बनियन विकत घेतला. तेच घालून तो संसदेत गेला होता. अमोलने अनेक ठिकाणी भरतीसाठी प्रयत्न केले. तो फक्त पोलिस आणि मिल्ट्री भरतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करत होता. माझा मुलगा वापस आला नाही तर मी आत्महत्या करेन, असा इशारा अमोलचे वडील धनराज शिंदे यांनी दिला.