मुंबई : तुम्हाला गृहीत धरले जात आहे. तुमच्या मतांशी प्रतारणा केली जात आहे. त्यामुळे तुम्हाला गृहीत धरणा-यांना, मतांशी प्रतारणा करणा-यांना धडा शिकवायचा आहे. त्यामुळे क्रांती करा, वचपा काढा असे आवाहन राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले. दस-याच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वांना दस-याच्या शुभेच्छाही दिल्या. त्याच वेळी त्यांनी आगामी निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे या निवडणुकीत तुम्ही बेसावध राहू नका. नाहीतर पुढली पाच वर्षे तुम्हाला पश्चातापाशिवाय काही पर्याय राहात नाही असेही राज ठाकरे म्हणाले.
आज दस-यानिमित्ताने शिंदेसेनेचा आझाद मैदानात, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेंचा शिवाजी पार्कमध्ये, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा भगवान गडावर तर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा नारायण गडावर होत आहेत. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दसरा मेळावा न घेता त्यांनी पॉडकास्टच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला आणि मतांचे राजकारण करणा-या राजकीय पक्षांवर सडकून टीका करत मी हेवा वाटावा अशा महाराष्ट्राचे स्वप्न बघतोय. नवा महाराष्ट्र साकारण्याची मनसेला एकदा संधी द्या. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र माझ्या हातून घडवून दाखवेन असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
महाराष्ट्राला लुटल्या जातेय
महाराष्ट्राचे सोने गेली अनेक वर्षे लुटलं जातंय आपण फक्त आपट्याची पाने एकमेकांना वाटतोय. आपल्या हातात आपट्याच्या पानाशिवाय काही राहिले नाही. बाकीचे सर्व जण सर्व लुटून घेऊन जात आहेत. पण आपल्याला तिकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. कारण आपण स्वत:मध्ये मश्गूल आहोत. जातीपातीच्या राजकारणात आपण अडकलो गेलो आहोत, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.