नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे काही दिसत नाही. आधी संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर पडला. त्यानंतर पहिल्या कसोटी सामना जिंकेल असे वाटत होते पण पराभवाला सामोरे जावे लागले. आता संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला दुस-या कसोटी सामन्यात खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहेत.
हैदराबादमधील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी जडेजाला बेन स्टोक्सने धावबाद केले. जडेजा आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याला काहीतरी प्रॉब्लेम असल्याचे दिसत होते. त्याला हॅमस्ट्रिंगची समस्या आहे आणि दुस-या सामन्यात खेळणे त्याच्यासाठी कठीण आहे.
जडेजाच्या धावबादमुळे टीम इंडियाला पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले असे म्हणाता येईल. कारण त्याची विकेट सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली. दुसरी कसोटी २ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याने भारताच्या नंबर वन अष्टपैलू खेळाडूला विशाखापट्टणममध्ये खेळणे कठीण दिसत आहे.
रवींद्र जडेजाने भारताच्या पहिल्या डावात सर्वाधिक ८७ धावा केल्या आणि दोन डावात पाच विकेट घेतल्या. दुस-या डावात फलंदाजी करताना तो वेगाने धावण्याचा प्रयत्न करत होता. पण बेन स्टोक्सच्या अचूक थ्रोने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तो मैदानाबाहेर जाताना त्याला हॅमस्ट्रिंगची काही समस्या झाल्याचे दिसत होते. त्याच्या जागी कुलदीप यादवचा समावेश होऊ शकतो.