बंगळुरू : कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात १०८ फूट उंच स्तंभावरून हनुमान ध्वज हटवल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी स्तंभावरून हनुमान ध्वज हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आले होते. यामुळे गावातील लोक संतप्त झाले आणि निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने याठिकाणी पोहोचले. यावेळी संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यानंतर प्रशासनाने स्तंभावरील हनुमान ध्वज काढून तेथे तिरंगा फडकवला.
ही घटना मंड्या जिल्ह्यातील केरागोडू गावात घडली. जिल्हा प्रशासनाच्या या कारवाईमुळे गावातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. केरागोडू गावातील लोकांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी गावातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. एवढेच नाही तर सर्व विरोधी पक्ष, भाजपा आणि जेडीएस तसेच हिंदू संघटनांचे सदस्य हनुमान ध्वज उतरवल्याच्या निषेधार्थ मैदानात उतरले आहेत. या घटनेच्या विरोधात भाजपाने राज्यभर निदर्शने केली. दरम्यान, ज्या ठिकाणी स्तंभ उभारला आहे, ती जागा सरकारी जमीन आहे. काही अटींसह तेथे स्तंभ उभारण्यासाठी प्रशासनाने ग्रामपंचायतीला एनओसी दिली होती. या परिस्थितीत एक महत्त्वाची अट होती की, येथे कोणताही धार्मिक किंवा राजकीय ध्वज फडकवला जाणार नाही. या ठिकाणी फक्त तिरंगा किंवा राज्य ध्वज फडकवता येतो, असे याबाबत जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. अधिका-यांनी पुढे सांगितले की, या सर्व अटी मान्य करणारे पत्र आणि ग्रामपंचायतीचे हमीपत्र आमच्याकडे आहे. २२ जानेवारीला अयोध्येतील रामलला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तिथे हनुमान ध्वज फडकवण्यात आला होता, यावर कोणीही आक्षेप घेतला नाही. २६ जानेवारी रोजी पंचायतीने येथे तिरंगा फडकावला आणि संध्याकाळी खाली उतरवला. त्यानंतर २७ जानेवारीला येथे हनुमान ध्वज पाहिल्यानंतर काही लोकांनी आक्षेप घेतला, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
ग्रामस्थांचा आमदारांवर आरोप
याप्रकरणी काँग्रेसचे स्थानिक आमदार रवी गनिगा यांच्या सूचनेवरूनच हनुमान ध्वज उतरवण्यात आल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पोलिस बळाचा वापर करून तेथे ध्वजारोहण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे रविवारी सकाळीग्रामस्थांनी मुख्यमंत्री आणि मंड्याचे काँग्रेस आमदार गनिगा रविकुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.