श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पूँछमध्ये आज संध्याकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनांवर हल्ला केला. भारतीय जवानांनी देखील प्रत्युत्तरात जोरदार गोळीबार केला. तोपर्यंत कोणतीही दुखापत किंवा मृत्यूचे वृत्त नाही आणि गोळीबार सुरू आहे.
राजौरीतील डेरा की गली येथे झालेल्या हल्ल्यात ४ जवान शहीद आणि ५ जण जखमी झाल्यानंतर गेल्या काही आठवड्यांत या भागातील लष्करावर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. आज संध्याकाळी हा हल्ला त्या ठिकाणापासून ४० किमी अंतरावर झाला. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी लष्कर संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवत आहे. एक दिवस अगोदर म्हणजेच गुरुवारी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सुरक्षा दलांनी राजौरीतील मांजाकोट परिसरात शोध मोहीम राबवली होती. शोध मोहिमेदरम्यान जम्मू-काश्मीर पोलिस आणि सुरक्षा दलांनी ४ टिफिन बॉम्ब, आयईडी, एक बुलेट राऊंड, वॉकी टॉकी सेट आणि इतर वस्तू जप्त केल्या. राजौरी आणि पँूछमध्ये दहशतवाद संपवण्यासाठी सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे. दरम्यान, आज सुरक्षा दलांनी राजौरीतील मांजाकोट भागात शोध मोहीम राबवली आणि या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले.