श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात गुरुवारी (२१ डिसेंबर) दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या या गोळीबारात तीन जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजौरी-थानमंडी-सुरनकोट मार्गावरील सावनी भागात लष्कराच्या वाहनावर हल्ला करण्यात आला.
ते म्हणाले की, हे वाहन बफलियाज येथून सैनिकांना घेऊन जात होते. बुफलियाजमध्ये बुधवारी (२० डिसेंबर) रात्रीपासून दहशतवाद्यांविरोधात घेराव आणि शोध मोहीम सुरू आहे. सैनिक एका मोहिमेवर जात होते आणि याच दरम्यान त्यांच्यावर हल्ला झाला. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, परिसरात चकमक सुरू आहे. अतिरिक्त सैनिक घटनास्थळी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.