16.2 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeअंतरराष्ट्रीयपाक लष्करावर दहशतवादी हल्ला

पाक लष्करावर दहशतवादी हल्ला

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला झाला असून दहशतवाद्यांनी एका सुरक्षा चौकीला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात ७ सुरक्षा जवान शहीद झाले, तर १८ जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कलातच्या जोहान भागात डोंगरावर असलेल्या चेक पोस्टवर घडली.

अहवालात पाकिस्तानी लष्कराच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सच्या हवाल्याने म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री शाह मर्दानजवळील सुरक्षा चौकीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणा-या सहा दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले, तर चार जण जखमी झाले. गोळीबारात सात जवान शहीद झाले.

आयएसपीआरनुसार, फ्रंटियर कॉर्प्सच्या शाह मर्दान चेक पोस्टवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी रॉकेट, ग्रेनेड आणि स्वयंचलित जड शस्त्रांचा वापर केला. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी कलात विभागीय आयुक्तांच्या हवाल्याने म्हटले आहे की, सकाळच्या हल्ल्यात चेक पोस्टवर तैनात असलेल्या सात जवानांना आपला जीव गमवावा लागला, तर १८ जण जखमी झाले. जखमी आणि मृतदेह सीएमएच, क्वेट्टा येथे पाठवण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी परिसराला वेढा घातला होता. चौकीवर तैनात असलेल्या जवानांनी प्रत्युत्तर दिले आणि तीन तास जोरदार गोळीबार सुरू होता. हल्ल्याची माहिती मिळताच एफसी जवानांची आणखी एक तुकडी परिसरात पोहोचली आणि हल्लेखोरांशी चकमक झाली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुमारे तीन डझन सशस्त्र लोकांनी शाह मर्दान एफसी चेक पोस्टला वेढा घातला आणि जोरदार शस्त्रांनी हल्ला केला. तीन तास गोळीबार सुरू होता. पहाटेनंतरही स्थानिक लोकांनी स्फोट आणि गोळ्यांचा आवाज ऐकला. कलातच्या उपायुक्तांनी सांगितले की, हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी जोहान आणि त्याच्या आसपासच्या भागात शोध मोहीम सुरू केली आहे.

बीएल आर्मीने स्वीकारली जबाबदारी
आठवडाभरात पाकिस्तानवर झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. याआधी गेल्या आठवड्यात क्वेट्टा रेल्वे स्थानकावर झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला होता आणि सुमारे ६० जण जखमी झाले होते. प्रतिबंधित बलुच लिबरेशन आर्मीने चेक पोस्टवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR