इम्फाळ : वृत्तसंस्था
मणिपूरमध्ये दहशतवाद्यांनी जिरिबाम जिल्ह्यातील एका गावावर हल्ला केल्यानंतर शनिवारी येथे पुन्हा हिंसाचार भडकला आहे. दहशतवाद्यांनी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह पहाटे पाच वाजता बोरोबेकरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावाला लक्ष्य केले.
दहशतवाद्यांनी गोळीबार करत या गावावर बॉम्बहल्लाही केला. केंद्रीय राखीव पोलिस दल आणि पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून बराच वेळ गोळीबार होत होता. घटनास्थळी अतिरिक्त कुमक पाठवली जात असल्याचे पोलिस अधिका-यांनी सांगितले. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अधिका-याने दिली.
गावात पुन्हा हिंसाचार सुरू झाल्याने सुरक्षा दलाकडून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना सुरक्षित स्थळी नेले जात आहे. जिरिबाम शहरापासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेला बोरोबेकरा परिसर दाट जंगलांनी वेढलेला असून हा डोंगराळ भाग आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात राज्यात जातीय हिंसाचार उसळल्यानंतर या परिसरात असे अनेक हल्ले झाले होते. राज्यातील संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी मेइती आणि कुकी समाजाच्या आमदारांची नवी दिल्लीमध्ये नुकतीच बैठक झाली होती. त्याला काही दिवस उलटत नाही, तोच हिंसाचाराची घटना घडली आहे.
दोन दहशतवाद्यांना अटक
मणिपूरच्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यातून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. प्रतिबंधित कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टीच्या (पीपल्स वॉर ग्रुप) च्या मुटुम इनाव सिंग (३१) आणि खवैरकपम राजेन सिंग (२५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.