24.7 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeमहाराष्ट्रटीईटी परीक्षा रखडणार?

टीईटी परीक्षा रखडणार?

विधानसभा निवडणूकीचा अडथळा आचारसंहितेमुळे आयोजन प्रक्रियेत अडथळे

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ऑफलाइन माध्यमातून घेण्यास राज्य शासनाने मार्च महिन्यात परवानगी दिली. मात्र, त्यानंतर निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे जूनअखेरपर्यंत परीक्षेच्या आयोजनाबाबत पावले उचलता आली नाहीत. त्यात आता पुन्हा काही महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीईटी परीक्षा रखडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

राज्य परीक्षा परिषदेने यंदा टीईटी ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे ठरवले होते; मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाने मार्च महिन्यात ऑफलाइन परीक्षेसाठी परवानगी दिली; मात्र त्यानंतर १६ मार्च रोजी लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली. मेअखेर आचारसंहिता उठताच राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे परीक्षा परिषदेला जूनअखेरपर्यंत परीक्षा एजन्सी नियुक्तीसाठी निविदा मागविणे, ‘सीईटी’ची जाहिरात प्रसिद्ध करता आली नाही. त्यात सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असून टीईटी परीक्षा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पारदर्शकतेचे आव्हान राहणार
मागच्या वेळी टीईटी परीक्षेत झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षा एजन्सीची नियुक्ती, प्रश्नपत्रिका फुटू नये, याबाबत दक्षता घेत पारदर्शकपणे परीक्षा व्हावी, यासाठी नियोजन करावे लागणार आहे.

केव्हा होणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष
शिक्षक होण्यासाठी टेट परीक्षा देण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. राज्यात सध्या २१ हजार ६७८ पदांवर शिक्षक भरती सुरू आहे. तसेच आगामी काळातही रिक्त जागांवर शिक्षक भरती होऊ शकते. त्यामुळे पुढील टीईटी परीक्षा केव्हा होणार, याची अनेक उमेदवार वाट पाहत आहेत.

सप्टेंबरमध्ये टीईटी घेऊ : डॉ. बेडसे
टीईटी परीक्षेच्या आयोजनाबाबत तज्ज्ञांच्या कार्यशाळा घेत आहोत. परीक्षा एजन्सी नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाईल. त्यानंतर ऑगस्टमध्ये उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले जातील आणि सप्टेंबरपूर्वी टीईटी घेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR