मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेना दोन गटात विभागली गेली. यानंतर सर्वच गोष्टी एकनाथ शिंदे यांच्याच बाजूने गेल्या. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचे सर्वाधिक पाठबळ हे एकनाथ शिंदे यांनाच मिळाले. मात्र, आज पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिला असून, पक्षासाठी निधी स्वीकारण्यास परवानगी दिली.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला यापुढे निधी स्वीकारता येणार आहे. खुद्द केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला ही मंजुरी दिली. निवडणूक आयोगाने नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालादेखील निधी स्वीकारण्यास मंजुरी दिली होती. शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनीदेखील निवडणूक आयोगात याबाबतची मागणी केली होती. उद्धव ठाकरेंची ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली.
ठाकरे गटात जोरदार हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षात सध्या प्रचंड हालचाली सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला चांगले यश मिळाले. काही ठिकाणी अतिशय थोड्या फरकाने ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला. आगामी विधानसभा निवडणुकीत १०० जागांवर निवडणूक लढवावी आणि सर्वाधिक जागा जिंकून आणाव्यात, अशी रणनिती सुरू आहे.