24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रअहिल्यानगरमध्ये ठाकरे गट बंडखोरीच्या तयारीत

अहिल्यानगरमध्ये ठाकरे गट बंडखोरीच्या तयारीत

अहिल्यानगर : महाविकास आघाडीच्या जागावाटपात अहिल्यानगर (अहमदनगर) शहर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे गेली. त्यांच्याकडून माजी महापौर अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यासाठी जोरदार दावा केलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी नाराजी पसरली आहे. काही पदाधिका-यांनी सामुहिक राजीनामे देण्याची तयारी बोलून दाखविली. त्यामुळे रविवारी सायंकाळी पक्षाची तातडीची बैठक झाली.

त्यामध्ये राजीनामे न देता स्वतंत्रपणे लढण्यावर चर्चा झाली. त्यानुसार उद्या दुपारी १ वाजता पुन्हा अंतिम बैठक घेऊन उमेदवार आणि पुढील भूमिका ठरविण्यात येणार आहे. तर याच जागेवर दावा असलेल्या काँग्रेसमध्येही नाराजी आहे. त्यामुळे शहरातील काही पदाधिका-यांनी संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर येथील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात जाण्याचे ठरविले आहे. इतरांन मात्र पक्षाचा निर्णय मान्य करण्याचे ठरविले असल्याचे सांगण्यात आले.

शहर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माजी महापौर अभिषेक कळमकर यांना उमेदवारी दिली आहे. पवार यांचे जुने खंदे समर्थक दादा कळमकर यांचे अभिषेक पुतणे आहेत. त्यांची लढत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सलग दोन वेळा आमदार असलेले संग्राम जगताप यांच्याशी होणार आहे. पक्षाला जागा न मिळाल्याने शिवसैनिक नाराज झाले. रविवारी सायंकाळी झालेल्या बैठकील जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, विक्रम राठोड, संभाजी कदम यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेचा उमेदवारच नसल्याने शहरातील पक्षाचे अस्तित्व धोक्यात आल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.

शिवसेनेचे नगर शहरातील अस्तित्व १९८९ पासून आहे. माजी आमदार अनिल राठोड यांनी पंचवीस वर्षे प्रतिनिधीत्व करून पक्ष वाढविला. आता पहिल्यांदाच गेल्या ३५ वर्षांमध्ये पक्षाला उमेदवारी मिळाली नाही. या निर्णयामुळे नगर शहरातील शिवसैनिक, कार्यकर्ते, नागरिक आणि साधा नगरकर अस्वस्थ झालेले आहेत, अशा भावना यावेळी व्यक्त झाल्या. शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेऊन उद्या २८ ऑक्टोबरला पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय झाला. राजीनामे देण्याऐवजी लढावे, असा निर्णय झाला. सर्व इच्छुकांनी २९ ऑक्टोबरला अर्ज दाखल करायचे, त्यानंतर पक्ष सांगेल त्याप्रमाणे निर्णय घ्यायचा, असे यावेळी ठरविण्यात आले. आता उद्याच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. जर पक्षाच्या आदेशानुसार बंड थंड झाले तर गेल्या ३५ वर्षांत नगरमध्ये प्रथमच शिवसेनेशिवाय निवडणूक होणार आहे.

गेल्या दोन निवडणुकांत शिवसेनेला पराभव स्वीकारावा लागला होता. तर आता शिवसेना ंिरगणातही नसण्याची नामुष्की येऊन ठेपली आहे. यात आणखी एक योगायोग असा आहे की, माजी आमदार दादा कळमकर राष्ट्रवादी एकत्र असताना शिवसेनेच्या अनिल राठोड यांच्याकडून चार वेळा पराभूत झाले होते. त्यानंतर दहा वर्षांपूर्वी राठोड यांचा सलग दोनदा पराभव करून संग्राम जगताप विजयी झाले. आता कळमकर यांचे पुतणे जगताप यांच्या विरूद्ध रिंगणात उतरले आहेत. या दृष्टीनेही ही निवडणूक रंगतदार होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR