जळगाव : महाविकास आघाडीमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटली आहे. या जागेसाठी ठाकरे गटाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला खुले आव्हान दिले आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव लोकसभेत ठाकरे गटाच्या उमेदवाराने किमान डिपॉझिट वाचवून दाखवावे. डिपॉझिटही ते वाचवू शकत नाहीत. बाकी काय बोलायचं, अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला आव्हान दिले आहे.
गुलाबराव पाटील यांच्या या प्रतिक्रियेनंतर शिवसेना ठाकरे गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे. मात्र लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच जळगाव लोकसभा मतदारसंघात या निमित्ताने वातावरण तापल्याचे दिसून येत आहे.
गुलाबराव पाटील यांचे भाषण सुरू असताना बत्ती गुल
दरम्यान, जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी येथील विकास कामांच्या सोहळ्यात मंत्री गुलाबराव पाटील यांचे भाषण सुरू असताना अचानक बत्ती गुल झाली. यावेळी भाषण न थांबवता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लाईटचं आणि माझं जमत नाही हे माझं कायमचं नातं आहे, असे मिश्किल वक्तव्य केले.
महावितरण कंपनीचे आभार – गुलाबराव पाटील
मंत्री गुलाबराव पाटील यांचे व्यासपीठावर भाषण सुरू असताना अचानक बत्ती गुल झाली. मात्र तरीही भाषण न थांबवता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रसंगावधान राखत आपल्या अनोख्या शैलीत मिश्किल वक्तव्य केले. तसेच वारा वादळ सुरू असतानाही बराच काळ लाईट टिकली. त्यामुळे महावितरण कंपनीचे आभार मानतो असे सुद्धा यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. मंत्री गुलाबराव पाटील भाषण आटोपत घेत असतानाच पुन्हा वीज पूर्ववत सुरू झाली.
गुलाबराव पाटील-रोहित पवारांमध्ये खडाजंगी
अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अर्थसंकल्पाच्या मुद्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला. याचवेळी त्यांनी मंत्र्यांच्या बंगल्यासाठी ३० कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्याची माहिती सभागृहात दिली. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आक्षेप घेत रोहित पवारांना सुनावले. तर रोहित पवारांनीही आक्रमकपणे गुलाबराव पाटलांना उत्तर दिले.