लातूर : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात आलेली पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी जोरदारपणे आपल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. दरम्यान लातूर जिल्ह्यातील एका प्रचार सभेला जात असताना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्यात आली आहे. औसा हेलीपॅडवर उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
लातूर जिल्ह्यातील औसा हेलीपॅडवर ठाकरेंच्या बॅग तपासण्यात आल्या आहेत. काल वणी येथे देखील त्यांची बॅग तपासण्यात आली होती.
निवडणूक आयोगाने घातलेल्या आचारसंहितेचा आदर केला पाहिजे. मात्र ही आचारसंहिता केवळ आमच्यासाठी आहे की, सत्ताधा-यांसाठीही आहे? असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. हे जे काही चालू आहे त्यावरून ठरवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले जात आहे. त्यांचे प्रतिमाहनन करण्यासाठी या प्रकारचे कृत्य केल्े जात आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचासाठी उद्धव ठाकरे यवतमाळ जिल्ह्यात आहेत. दरम्यान वणी येथे प्रचारसभेसाठी जात असताना निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या बॅगची झडती घेतली. त्यामुळे संतापलेल्या ठाकरेंनी अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले आणि नंतर प्रचारसभेतही चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी याचा स्वत: व्हीडीओही शूट केला आहे.
गेल्या चार महिन्यांत फक्त बॅग तपासण्यासाठी मीच सापडलो का? नरेंद्र मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅग का तपासल्या नाहीत आजपर्यंत? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी अधिका-यांना केला. मी तुमच्या कामात अडथळा आणणार नाही, मात्र सर्व पक्षांच्या नेत्यांची झडती घ्या. पण या निवडणुकीत नरेंद्र मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याही बॅगा तपासल्याचे व्हीडीओ समोर आले पाहिजेत, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.