परभणी : आयटक सलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने ४ डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. आज बुधवार, दि. २७ डिसेंबर रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोरील उपोषण मैदानात सुरू असलेल्या संप दरम्यान थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार थाळीनाद करीत परीसर दणाणून सोडला होता.
अंगणवाडी, बालवाडी मदतनिस कर्मचा-यांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज बुधवारी थाळी नाद आंदोलन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी केंद्र दुस-या कर्मचारी यांच्या मार्फत चालू करण्याच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली.
जो पर्यंत संघटना आदेश देत नाहीत तो पर्यंत अंगणवाडीच्या चाव्या आम्ही कोणालाही देणार नाही असा निर्धार यावेळी अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केला. याआंदोलनात आयटक सलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन व महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या सेविका मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.