जिंतूर / प्रतिनिधी
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन अशासकीय प्रशासक मंडळाने बनावट लेआउट तयार करून प्लॉट काढून अनाधिकृत गाळे तयार करून विक्री केले. दरम्यान गाळे बांधकाम केलेली जागा बांधकाम विभागाची असल्यामुळे प्रकरण जिल्हा न्यायालयात गेले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाजूने निर्णय आल्यानंतर बाजार समितीने तातडीने दि.६ ऑक्टोबर रोजी सकाळीच अनधिकृत बांधकामावर कार्यवाही करून गाळे बांधकाम जमिनदोस्त केले. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
जिंतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन प्रशासक सचिव व अभियंता यांनी सन २०२२साली प्रशासक मंडळावर कार्यरत असताना सर्वांनी संगनमत करून बनावट लेआऊट तयार करून प्लॉट विक्री, बागबगीचा खर्च, बांधकाम खर्च, गोदमातील भंगार विक्री, स्वच्छता व दुरुस्ती, प्रवास खर्च, जेवण इत्यादी कामात जवळपास ३४ लाख रुपयांचा अपहार केल्यामुळे सध्याचे बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन संचालक मंडळ, सचिव व इतरांवर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान बाजार समितीच्या आवारातील येलदरी व वरुड रस्त्यावर तत्कालीन प्रशासक मंडळाने व्यापारी गाळे बांधकाम करून विक्री करण्यात आले होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा न्यायालयात प्रकरण दाखल करून येलदरी रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती. यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात आली. यावेळी व्यापा-यांना आपल्या दुकानातील सामान काढून घेण्या अगोदरच जेसीबीने बांधकाम पडण्यास सुरुवात केली होती. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यवाहीत बाजार समितीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वरूड रस्त्यावरील अनाधिकृत बांधकामास २ दिवसांचा वेळ दिल्याने आश्चर्य
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या येलदरी रोडवरील व्यापारी गाळे जमीनदोस्त केले. मात्र वरुड रोडवरील अनधिकृत बांधकाम कामास बाजार समितीच्या वतीने २ दिवसांचा वेळ दिला असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नियमानुसार कारवाई : सभापती बोर्डीकर
जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात अनाधिकृत बांधकाम करण्यात आले होते. चुकीचा लेआउट बनवून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील बांधकाम झालेले आढळून आले. त्यामुळे हे बेकायदेशीर गाळे बांधकाम पाडण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. नागरिकांनीही कुठलेही जमीन, गाळे व्यवहार करताना कागदपत्र तपासली पाहिजे असे आवाहन सभापती गंगाधर बोर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.