22.8 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयशेतक-यांना रोखण्यासाठी प्रशासन सज्ज

शेतक-यांना रोखण्यासाठी प्रशासन सज्ज

रस्ते खोदले, काँक्रिटचे अडथळे उभारले ७ जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा खंडित

नवी दिल्ली : शेतकरी संघटनांकडून १३ फेब्रुवारी रोजी दिल्लीत जमण्यासाठी देण्यात आलेल्या हाकेच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने पुन्हा एकदा शेतक-यांना रोखण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. हरियाणा सरकारकडून अंबाला-पटियाला सीमा बंद करण्यात आली आहे. तसेच अंबाला, कुरुक्षेत्र, कठियाल, जिंद, हिसार, फतेहबाद आणि सिरसा या सात जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. हे सात जिल्हे शेतकरी आंदोलनाचे प्रमुख केंद्र म्हणून मानले जातात. त्यामुळे सरकारने या भागातील इंटरनेट सेवा बंद केली आहे.

शेतक-यांना हरियाणात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी पंजाबवरुन दिल्लीला जाण्यासाठीचा वेगवाना मार्ग म्हणून ओळखला जाणारा जीटी रोडही बंद केला आहे. याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. यापूर्वी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकार कोंडीत सापडले होते. शेतक-यांची ट्रॅक्टरसह महामार्गावर ठिय्या देत दिल्लीची सीमा रोखून धरली होती. या आंदोलनामुळे केंद्र सरकारची प्रचंड नाचक्की झाली होती.

त्यामुळे या आंदोलनाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हरियाणा सरकारकडून वेगाने पावले उचलली जात आहे. गेल्यावेळी शेतक-यांना रोखण्यासाठी हरियाणा सरकारने केलेला बळाचा वापर टीकेचा विषय ठरला होता. तरीही यावेळीही हरियाणा पोलिसांनी शेतक-यांना रोखण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. घग्गर परिसरात पोलिसांनी अनेक ठिकाणी रस्ता खणला आहे. जेणेकरुन शेतक-यांचे ट्रॅक्टर्स हा भाग ओलांडू शकणार नाहीत. तर पंजाबकडून येणा-या दाबवाली आणि शंभू रोडची सीमा बंद करण्यात आली आहे.

सामान्य प्रवाशांना त्रास
याशिवाय घग्गर परिसरात हरियाणा पोलिसांनी रस्त्यावर काँक्रिट ओतून अडथळे तयार केले आहेत. या सगळ्यामुळे दिल्लीकडे निघालेल्या सामान्य प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. अनेक प्रवाशांना याठिकाणी उतरुन सामान घेऊन अंबालाच्या दिशेने पायपीट करावी लागत आहे.

काय आहेत शेतक-यांच्या मागण्या?
संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा या संघटनांनी १३ फेब्रुवारीला दिल्लीत येण्याची हाक दिली आहे. शेतक-यांना पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) देण्यासाठी विविध कायदे बनवण्यासाठी या संघटना आग्रही आहेत. त्यासाठी दिल्लीत मोर्चा नेण्यात येणार आहे. हरियाणा पोलिसांनी सामान्य प्रवाशांना आवश्यक असेल तरच प्रवास करा, अशा सूचना दिल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR