मुंबई : एकीकडे जुनी पेन्शन योजनेसाठी संपाची हाक देणारे शासकीय कर्मचारी संघटनांची समजूत काढत नाहीत तो आता सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी संपावर जाण्याच्या इशारा दिल्याने सरकारची चिंता वाढणार आहे.
राज्यभरातील ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी व संगणक परिचालक यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १८ ते २० डिसेंबर या कालावधीत तीन दिवस काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, त्या त्या पंचायत समित्यांसमोर आंदोलने देखील केली जाणार आहेत. या आंदोलनात राज्यभरातील सुमारे २७ हजार ग्रामपंचायत आणि ६० हजार कर्मचा-यांचा सहभाग असणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्य अध्यक्ष विलास कुमरवार यांनी दिली आहे.
नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे नागपूर विधानभवनावर अनेक आंदोलने धडकत आहेत. तर, काही शासकीय संघटनांनी काम बंद करण्याची हाक दिली आहे. अशातच आता अखिल भारतीय सरपंच, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ, ग्रामरोजगार सेवक संघटना, संगणक परिचालक संघटना आदी संघटनांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून तीन दिवस काम बंदची हाक दिली आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायतींचा कारभार आजपासून ठप्प होण्याची शक्यता आहे.
तीव्र लढा उभा करण्याचा इशारा
या राज्यव्यापी संपात अखिल भारतीय सरपंच परिषद, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, ग्रामपंचायत कामगार सेना याबरोबरच गावगाडा हाकणा-या सर्वच संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. तीन दिवस बंदनंतरही मागण्या मान्य नाही झाल्यास यापेक्षा तीव्र लढा उभा करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्य अध्यक्ष विलास कुमरवार यांनी दिली आहे. त्यामुळे या संपाचे ग्रामीण भागावर परिणाम होण्याची शक्यता आहे.