24.3 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeमहाराष्ट्रपोलिस महासंचालकांची नियुक्ती अद्याप रखडली

पोलिस महासंचालकांची नियुक्ती अद्याप रखडली

मुंबई : प्रतिनिधी
केंद्र सरकार आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आक्षेपांमुळे ज्येष्ठ पोलिस अधिकारी डॉ. रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती रखडली आहे. महासंचालकपदाबाबत ३१ डिसेंबरपूर्वी निर्णय न झाल्यास शुक्ला यांची नियुक्ती होणे अवघड होईल, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी नियुक्ती होऊन सव्वादोन महिने उलटूनही त्यांना राज्य सरकारने पदमुक्त न केल्याने हे पद रिक्तच आहे.

सेठ हे नियत वयोमानानुसार ३१ डिसेंबर रोजी महासंचालकपदावरून सेवानिवृत्त होत आहेत. पण राज्य सरकारने त्यांची ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारल्यावर लगेच त्यांची पोलिस सेवेतील स्वेच्छानिवृत्ती मंजूर होईल. सेठ यांची सेवानिवृत्ती लक्षात घेऊन गृहविभागाने महासंचालकपदाच्या नावांच्या शिफारशीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे सप्टेंबरमध्येच प्रस्ताव पाठविला होता. पोलिस महासंचालक व अतिरिक्त महासंचालक दर्जाच्या आणि ३० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या अधिका-यांची यादी आणि प्रत्येकाचा सेवाकाळातील संपूर्ण तपशील गृहविभागाने आयोगाला पाठविला होता.

शुक्ला या सेवाज्येष्ठतेनुसार पहिल्या असून १९८८ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही राजकीय नेत्यांचे दूरध्वनी टॅप केल्याच्या आरोपाखाली दोन गुन्हे नोंदविण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने १२ सप्टेंबर २३ रोजी हे गुन्हे रद्दबातल केल्यानंतर शुक्ला यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात होते. मात्र, यावर निर्णय होताना दिसत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR