27.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रमस्साजोग खून प्रकरणी वातावरण तापले

मस्साजोग खून प्रकरणी वातावरण तापले

भाजप-ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोप

बीड : प्रतिनिधी
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी. यात कुणीही राजकारण करू नये. तसेच, बीड मतदारसंघातील पवनचक्की प्रकरणी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचीही चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचे मूळ कारण पवनचक्की ठरली. याप्रकरणात आमदार संदीप क्षीरसागर यांनी राजकारण करू नये. आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी आपली स्पष्ट भूमिका आहे. मागील काही दिवसांपासून बीड मतदारसंघात पवनचक्की कंपन्यांच्या अधिकारी, कर्मचा-यांकडून शेतक-यांची पिळवणूक केली जात आहे, यात स्थानिक आमदारांचे आर्थिक हितसंबंध देखील आहेत.

त्यांच्या वरदहस्तामुळे अनेक शेतक-यांना त्रास होत आहे. याबाबत आपण अनेकदा आवाज उठविलेला असून बीडच्या आमदारांसह पवनचक्की कंपनीच्या अधिकारी, कर्मचा-यांची कसून चौकशी करण्याची गरज आहे. या साखळीमुळे बीड मतदारसंघातील अनेक शेतक-यांच्या जमिनी बळकावल्या, पिकांची हानी केली, मोबदला देण्यास टाळाटाळ होत असून शेतक-यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. मस्साजोगसारखी अप्रिय घटना टाळण्यासाठी शासनाने बीडच्या आमदारांसह मतदारसंघातील पवनचक्की कंपन्यांच्या अधिकारी, कर्मचा-यांची कसून चौकशी करून दोषींविरोधात कारवाई करावी, अशी मागणी डॉ. योगेश क्षीरसागर यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते भेटले पोलिस अधीक्षकांना
राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बीडचे पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांची भेट घेतली आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करा, प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR