नागपूर : प्रतिनिधी
भाजप देशाला गुलामगिरीकडे घेऊन जात आहे. कोणाचेच ऐकायचे नाही, हा पंतप्रधान मोदींची स्वभाव आहे. त्यामुळे वरून आदेश दिले जातात आणि बाकीच्यांना ते ऐकावे लागतात. मात्र, कॉंग्रेसमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य आहे. देशाचे नेतृत्त्व सर्वसामान्य लोकांच्या हाती असायला हवे, ही आमची विचारधारा आहे. त्यामुळे देशात दोन विचारधारांमध्ये लढा सुरू आहे, असे सांगत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप, रा. स्व. संघावर जोरदार हल्लाबोल केला. कॉंग्रेसच्या वर्धापन दिनाने औचित्य साधून कॉंग्रेस पक्षाने नागपुरात शक्तिप्रदर्शन करतानाच आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंगही फुंकले.
नागपुरात आज काँग्रेसचा १३९ व्या स्थापनादिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तैयार है हम या टॅगलाईनखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. नरेंद्र मोदी हे स्वत:ला ओबीसी असल्याचे म्हणाले होते. त्यांचे सरकार हे ओबीसी असल्याचे ते म्हणाले होते. मग त्यांना आम्ही विचारले की, त्यांच्या सरकारमध्ये किती ओबीसी लोक आहेत, त्यांच्या सरकारमध्ये किती अधिकारी ओबीसी आहेत? त्यानंतर ते म्हणाले की, देशात फक्त एकच जात आहे आणि ती म्हणजे गरिबी. मग असे असेल तर तुम्ही स्वत:ला ओबीसी कसे काय म्हणता, असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी आम्ही दिल्लीत सत्तेत आलो तर देशात जातीय जनगणना केली जाईल, असे आश्वासन दिले.
देश फक्त ९० लोक चालवतात. त्यामध्ये आयएएस अधिकारी आहेत, ते संपूर्ण बजेटचे नियोजन करतात. मी त्यावर विचारले की, या ९० लोकांमध्ये किती अधिकारी हे ओबीसी आणि दलित आहेत. त्यामधील फक्त ३ अधिकारी ओबीसी असल्याचे समोर आले आहे. मग हे कसले ओबीसींचे सरकार? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. स्वातंत्र्यापूर्वी भारतात ब्रिटिशांचे राज्य आणि राजेशाही होती, त्यावेळी राजा म्हणेल ते खरे अशी स्थिती होती. आताही तीच परिस्थिती आहे. कुणाचेच ऐकून घ्यायचे नाही, हा नरेंद्र मोदी यांचा स्वभाव आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. पूर्वी दलितांना स्पर्श केला जायचा नाही, ही आरएसएसची विचारधारा आहे, आता देश त्याच मार्गावरून नेला जात असल्याचेही ते म्हणाले.
स्वातंत्र्यापूर्वी या देशात पाचशे-सहाशे राजे, इंग्रज होते. त्यावेळी सामान्य जनता भरडली जात होती. त्यावेळी उद्भवलेल्या संघर्षात अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने सर्वांना समान मानले आणि प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला. सर्वसामान्य असो वा दलित, आदिवासी असो किंवा राजा असो, सर्वांनाच काँग्रेसने एका मताचा अधिकार दिला आणि सर्वांना समान पातळीवर आणले, असे राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी सरकारने सुरू केलेल्या अग्नीवीर योजनेवर राहुल गांधी यांनी टीका केली. या योजनेच्या माध्यमातून भाजपने तरुणांची चेष्टा चालवली असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.
भाजपचा देशाला गुलाम काळात नेण्याचा प्रयत्न
देशात सध्या दोन विचारसरणींचा संघर्ष सुरू आहे. भाजप देशाला स्वातंत्र्यपूर्व काळात, गुलामीच्या काळात नेण्याचा प्रयत्न करीत आहे, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सत्ताधा-यांवर तोफ डागली. काही दिवसांपूर्वी लोकसभेत मला भाजपचा एक खासदार भेटला. आता आम्हाला इथे सहन होत नाही. कारण आमचे कुणी ऐकतच नाही, असे त्यांनी म्हटले. भाजपची विचारसरणी राजांसारखी आहे. वरून आदेश येतो. त्याचे पालन केले जाते. काँग्रेसमध्ये सगळ््यांना बोलण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
गरीब जनतेसाठी कॉंग्रेसने संघर्ष केला
काँग्रेसने गरीब जनतेसाठी संघर्ष केला. हिंदुस्तानातील जनतेला कोणतेच अधिकार नव्हते. महिलांना कोणतेही हक्क नव्हते. हीच संघाची विचारसरणी आहे. आता हे लोक देशाला पुन्हा त्याच काळात घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली.