जैसलमेर : राजस्थानच्या जैसलमेर येथे वैमनस्यातून कुटुंबाचा बदला घेण्यासाठी जैसलमेरमध्ये एका तरुणाने स्मशानभूमीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर तो मृतदेह शेजा-यांच्या स्वयंपाकघरात आणून जाळला. किचनमध्ये मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्यावर पोलिसांना माहिती देण्यात आली. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा बनाव उघडा पडला.
पोलिसांनी आरोपी लक्ष्मण सिंह याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याने वैयक्तिक वैमनस्यातून शेजारी असणा-या हेमसिंह यांच्या कुटुंबाला अडकवण्यासाठी हा बनाव आखला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मे रोजी हेमसिंह हे कुटुंबासह शेजारच्या गावात गेले होते. रात्रभर ते तिकडेच थांबले होते. त्याच रात्री लक्ष्मण सिंह याने कट रचला. हेमसिंह आणि कुटुंबियांना कोणत्या ना कोणत्या प्रकरणात गोवण्याची योजना आखली होती. त्यासाठी स्मशनभूमीतून पुरलेला मृतदेह आणला अन् किचनमध्ये जाळला. लक्ष्मण सिंह याने प्लॅननुसार, १५ किमी दूर असलेल्या स्मशनभूमीत पोहचला. दीड महिन्यापूर्वी पुरलेला रेवतरामचा मृतदेह स्मशानभूमीतून बाहेर काढला. त्यानंतर रात्रीच्या अंधारात हेमसिंगच्या घरातील स्वयंपाकघरात आणून जाळण्यात आला. लक्ष्मण सिंह याने मृतदेह १५ किमी बाईकवरुन आणला. त्यानंतर हेमसिंग यांच्या स्वयंपाकघरात तो जाळला गेला. त्यानंतर पोलिसांना कळवले. पण गावक-यांच्या म्हणण्यानुसार रेवतरामचा मृतदेह दीड महिन्यापूर्वीच पुरण्यात आला होता.
लक्ष्मण सिंह याने मध्यरात्री स्मशानभूमीपासून १५ किलोमीटर अंतरावरून बाईकवरुन मृतदेह घेऊन हेमसिंहचे घर गाठले. त्यानंतर स्वयंपाकघरात तेल शिंपडून मृतदेह जाळला. पोलिसांच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली. हा सर्व प्लॅन पूर्ण करण्यासाठी लक्ष्मण सिंह याला पहाटेचे पाच वाजले होते. मृतदेह दुचाकीवर घेऊन लक्ष्णण हेमसिंहच्या घरी पोहोचला तेव्हा गावातील एका व्यक्तीने पाहिले होते. त्यानंतर त्याने इतर गावक-यांना माहिती दिली. सकाळी हेमसिंहचे नातेवाईक घरी पोहोचले असता गावक-यांनी त्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी लक्ष्मण सिंह याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाबाबत पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.