कोल्हापूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीतच काही भामट्यांनी हात धुवून घेण्यास सुरूवात केली आहे. त्याचा प्रत्यय कोल्हापुरात एका व्यापा-याला आला. भामट्यांनी आता बोगस निवडणूक पथकच सुरू केले आहे. एका नाक्यावर तपासणीचे ढोंग करत व्यापा-याला गंडा घातल्याचे समोर आले. त्यामुळे तुमच्या वाहनाची तपासणी करणा-या अधिका-यांकडे अगोदर त्यांचे ओळखपत्र जरूर मागा. नाहीतर तुम्हाला बोगस पथकाकडूनही गंडा घातला जाऊ शकतो.
कोल्हापूरमध्ये हा प्रकार घडला आहे. कोल्हापुरात बोगस तपासणी पथकाने व्यावसायिकाचे २५ लाख रुपये लांबविल्याची घटना घडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शासनाच्या तपासणी पथकांकडून सुरू असलेल्या तपासणीची हुबेहूब नक्कल करून फसवणूक केली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गालगत तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ ही घटना घडली. आरोपींनी व्यापारी सुभाष हर्णे यांची फसवणूक केली आहे.
व्यापारी सुभाष हर्णे हे यात्रेमध्ये पाळणा लावण्याचे काम करतात. ते सोमवारी २५ लाख ५० हजारांची रक्कम घेऊन तावडे हॉटेल येथे आले होते. त्यावेळी २५-३० वयोगटातील अज्ञात पाच जणांनी त्यांची कार अडवली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार तपासणीचे नाटक केले. कारच्या झडतीत त्यांच्या हाती ही रक्कम लागली. आरोपींनी त्यांनी त्यांच्या कारमध्ये बसवले. त्यानंतर थोडे पुढे गेल्यावर त्यांचा मोबाईल आणि रक्कम घेऊन ते पसार झाले.