16.2 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्रपहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

मुंबई : देशात सध्या १८ व्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आपापल्या उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त असून, आमच्या उमेदवारांनाच निवडून द्या असे आवाहन मतदारांना करत आहेत. दरम्यान आज सायंकाळी देशातील आणि राज्यातील पहिल्या टप्प्याच्या निवडणूक प्रचारांच्या तोफा थंडावणार आहेत.

कारण पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. यामुळे आजचा दिवस प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. शुक्रवारी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघांत मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात या मतदारसंघात होणार मतदान

  • नागपूर
    एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या नागपूर मतदारसंघात सध्या भाजपचे वर्चस्व आहे. भाजपने येथून विद्यमान केंद्रीय मंत्री भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. तर वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी येथून आपला उमेदवार न देता काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. बसपानेही आपला उमेदवार उभा केला असला तरी मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार आहे.
  • गडचिरोली
    गडचिरोली मतदारसंघाची ओळख अनुसूचित जमातींसाठीचा राखीव मतदारसंघ अशी असून, भाजपने येथून विद्यमान खासदार अशोक नेते यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून नामदेव किरसान निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
  • चंद्रपूर
    भाजपने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर मतदारसंघात निवडणूक रिंगणात उतरवले आहे. मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने येथून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. कुणबी विरुद्ध इतर ओबीसी असा सामना या मतदारसंघात रंगण्याची शक्यता आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा एकमेव खासदार येथून निवडून आला होता.
  • रामटेक
    हा अनुसूचित जातींसाठीचा राखीव मतदारसंघ असून, रामटेकमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि वंचितचे पाठिंबा असलेले अपक्ष यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. येथे वंचितने माघार घेतली असून, अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा दिला आहे. तर, श्याम बर्वे महाविकास आघाडीचे उमेदवार असून महायुतीने येथून राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे यामुळे येथे तिरंगी लढत पहावयास मिळणार आहे.रामटेकमध्ये दलित मतदार मतदारांची भूमिका निर्णयाक ठरणार आहे.
  • भंडारा-गोंदिया
    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागलेला मतदारसंघ म्हणजे भंडारा-गोंदिया या मतदारसंघातून भाजपने सुनील मेंढे या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली असून, काँग्रेसकडून यावेळी डॉ. प्रशांत पडोळे रिंगणात आहेत. तर बसपाकडून संजय कुंभलकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघातील लढत चुरशीची होणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR