नवी दिल्ली : भाजपने छत्तीसगडमध्ये आदिवासी नेते विष्णुदेव साय यांची मुख्यमंत्रीपदी आणि ओबीसी समाजातील मोहन यादव यांची मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदी निवड केली आहे. याबाबत काँग्रेसनेते अधीर रंजन चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राहुल गांधी जे काही मुद्दे उठवतात, पंतप्रधान मोदी लगेचच ते मुद्दा स्वीकारतात आणि त्याची अंमलबजावणी सुरू करतात. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये झालेला बदल हा राहुल गांधी केलेल्या मागणीचा परिणाम आहे, असा दावा त्यांनी केला.
अधीर रंजन चौधरी म्हणाले की, राहुल गांधी जे काही बोलतात त्याचा पंतप्रधान मोदींवर परिणाम होतो. राहुल गांधी जेव्हा जातनिहाय जनगणनेवर बोलतात, तेव्हा एकामागून एक राज्यातील मुख्यमंत्री त्याच समीकरणानुसार बनवले जातात. जिथे जातीय समीकरण बरोबर राहते. जातनिहाय जनगणनेची मागणी करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा हा प्रभाव आहे. त्या प्रभावाची ही झलक आहे. कर्नाटकात राहुल गांधींनी अवलंबलेल्या रणनीतीनुसार भाजपने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसाठी निवडणूक योजना आखल्याचा दावाही अधीर रंजन चौधरी यांनी केला.
ते म्हणाले की, राहुल गांधी कर्नाटकात गेले तेंव्हा त्यांनी पाच शपथ घेतली होती. त्यांनी पाच आश्वासने दिली होती की, ते सत्तेत आल्यास आम्ही या पाच आश्वासनांची अंमलबजावणी करू. पंतप्रधान मोदी आणि भाजप त्यांच्याकडून शिकले आहेत. राहुल गांधी जेंव्हा आश्वासने देत असत, तेव्हा मोदी आणि भाजप रेवडी, रेवडी म्हणत आवाज काढत. पंतप्रधान मोदी यांनी तीच रेवडी तीन राज्यात वाटायला सुरुवात केली, असे ते म्हणाले.