छत्रपती संभाजीनगर : निवडणूक प्रचारासाठी अवघा आठवडा शिल्लक असल्याने नेत्यांचे झंझावाती दौरे सुरु आहेत. अशा स्थितीत प्रमुख नेत्यांसाठी एक-एक मिनिट महत्त्वाचा आहे. परंतु आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेत वेळेचे नियोजन चुकले. त्यामुळे शिंदेंचा पारा चांगलाच चढला. त्यांनी खासदार संदीपान भुमरे यांना चांगलेच सुनावले. शिंदेंच्या चेह-यावरील संतप्त भाव कॅमे-यात रेकॉर्ड झाले.
शिंदेसेनेने कन्नड विधानसभा मतदारसंघातून संजना जाधव यांना उमेदवारी दिली आहे. त्या माजी रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यानंतर लगेचच त्यांना कन्नडमधून उमेदवारी जाहीर झाली. आज त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे कन्नडमध्ये आले होते. मतदारसंघात त्यांची भव्य सभा होती. पण या सभेत वेळेचें नियोजन चुकले. त्यामुळे शिंदे चांगलेच संतापले. मुख्यमंत्र्यांनी वेळेचे नियोजन चोख करण्याच्या सूचना आधीच दिल्या होत्या.
प्रत्यक्षात मुख्यमंत्री आले, त्यावेळी उमेदवार संजना जाधव, माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, स्थानिक खासदार संदीपान भुमरे यांची भाषणे व्हायची होती. त्यामुळे मुख्यमंत्री संतापले. त्यावेळी शिंदेंच्या चेह-यावर दिसणारा संताप कॅमे-यात कैद झाला. यावेळी त्यांनी स्टेजवर असलेल्या अन्य काही नेत्यांचादेखील समाचार घेतला.