मुंबई (प्रतिनिधी) : ठाणे-नाशिक, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरूस्ती करून नागरिकांना वाहतूककोंडीतून दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय महामार्ग, एमएसआरडी, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक पोलिस विभागाच्या अधिका-यांना दिले. नाशिक-भिवंडी रस्त्याच्या तातडीने दुरूस्तीसाठी युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना देतानाच रस्ते दुरूस्तीच्या कामात हयगय करू नका. पीक अवरमध्ये अवजड वाहतुकीच्या नियमनासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी एकत्रित अधिसूचना काढावी, अवजड वाहनांसाठी महामार्गालगत पार्किंग लॉट करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील वाहतूककोंडी, आगामी गणेशोत्सव कालावधीतील वाहतुकीचे नियोजन याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, कोकण विभागीय आयुक्त पी. वेलारासु, जेएनपीटीचे अध्यक्ष उन्मेष वाघ, ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम, परिवहन विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ठाणे, नाशिक, रायगड जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, वाहतूक पोलिस अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. नाशिक-भिवंडी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहतुकीसाठी अडचणी होत आहेत. पावसाळ्यात रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी, अपघात होत आहेत. याची मुख्यमंत्री शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून रस्ता दुरूस्तीचे काम तातडीने सुरू करून ते चांगल्या दर्जाचे आणि जलद गतीने करावे, अशा सूचना दिल्या आहेत.
दुरूस्तीच्या कामात अडथळा आणणा-यांविरुद्ध गुन्हे दाखल करा
ठाणे ते नाशिक, ठाणे ते अहमदाबाद या महामार्गावरील खड्ड्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांना वाहतूककोंडीमुळे होणा-या त्रासातून तात्काळ दिलासा देण्यासाठी यंत्रणांनी दिवस-रात्र एक करून खड्डे बुजवावेत. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. खड्डे बुजवताना रॅपिड क्विक सेटींग हार्डनर, एम सिक्टी या साहित्याच्या वापर करावा. तात्काळ खड्डे बुजविल्यास वाहतूककोंडी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी खड्डे भरायला कालावधी आवश्यक असतो तेथे प्रीकास्ट पॅनलचा वापर करावा. राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापनाने त्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. यंत्रणांनी समन्वयातून काम करावीत. दुरूस्तीच्या कामात अडथळा आणणा-यांविरुद्ध गुन्हे दाखल करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. महामार्ग दुरूस्ती कामाची उद्या पाहणी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
जेएनपीटीमधून अवजड वाहनांचे नियंत्रण
एकीकडे खड्डे बुजवण्याची कार्यवाही सुरू असताना वाहतूक नियमनासाठी ट्राफीक वॉर्डनची संख्या वाढविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. जेएनपीटीकडून येणा-या अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडीत भर पडू नये यासाठी या अवजड वाहतुकीचे नियमन करण्यासाठी जेएनपीटीमधून अवजड वाहनांचे नियंत्रण करण्यात यावे. त्याच्या समन्वयासाठी जिल्हाधिकारी ठाणे नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. जेएनपीटीकडून पनवेल, पुणे, ठाणेकडे जाणा-या महामार्गावरील खड्डेदेखील तातडीने बुजविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. नवी मुंबई, पनवेल, जेएनपीटी भागातून येणा-या वाहतुकीच्या नियमनासाठी सिडकोने नवी मुंबई पोलिसांना २०० ट्राफीक वॉर्डन उपलब्ध करून द्यावेत तसेच अवजड वाहनांसाठी आवश्यक तेवढ्या क्रेन जेएनपीटीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.