नागपूर : पाटलीपुत्र एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये कोच अटेंडन्टने नऊ वर्षांच्या चिमुकलीला शौचालयात कोंडून अश्लील चाळे केले. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी अटेंडन्टला चांगलेच बदडले. ही घटना मंगळवारी दुपारी १.३० च्या सुमारास घडली. लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मोहम्मद मुन्नू (३०) रा. चाकण, गया असे आरोपी अटेंडन्टचे नाव आहे. मुन्नू विवाहित असून त्याला एक चार वर्षांचा मुलगा आणि दोन वर्षांची मुलगी आहे.
नऊ वर्षांपासून तो रेल्वेत कोच अटेंडन्ट आहे. एसी बोगीतील प्रवाशांना बेडरोल, बेडशिट देणे आणि गोळा करण्याचे काम तो करतो. कंत्राटदारांकडून त्याची नियुक्ती केलेली आहे. गाडी क्रमांक २२३५२ बंगळुरू-पाटलीपुत्र सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये त्याची ड्युटी होती.
या गाडीने चिमुकली, तिची आई, आजी आणि भाऊ असे चौघेजण एसी डब्यातून पाटण्याला जात होते. बुटीबोरीजवळ गाडी असताना चिमुकली लघुशंकेला गेली. ब-याच वेळपासून तिच्यावर नजर ठेवून असलेला आरोपी सुद्धा तिच्या पाठीमागे गेला.
ती शौचालयात जाताच, क्षणाचाही विलंब न लावता आरोपीसुद्धा आतमध्ये गेला आणि दार बंद केले. या प्रकारामुळे चिमुकली घाबरली. त्याने तिच्याशी अश्लील चाळे केले. दार उघडताच ती रडत आईकडे गेली आणि घडलेला सारा प्रकार सांगितला.
कोच अटेंडन्टचे व्हेरिफिकेशन व्हावे
कंत्राटी पद्धतीने काम करणा-या कोच अटेंडन्टची माहिती, कोणत्या गाडीत किती अटेंडन्ट व त्यांची नावे काय अशी संपूर्ण माहिती रेल्वे प्रशासनाला हवी. ती कंत्राटदाराने द्यावी. यापूर्वी सुद्धा अशा घटना घडल्या असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
प्रवाशांचा संताप
आई आणि आजीने बोगीतील प्रवाशांना माहिती दिली. संतापलेल्या प्रवाशांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली. तसेच या घटनेची माहिती रेल्वे कंट्रोल आणि हेल्पलाईनवर दिली. लोहमार्ग पोलिसांचे पथक एक नंबरच्या फलाटावर आले. पीडित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. अशी माहिती पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांनी दिली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल.