मुंबई : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक क्षेत्र वगळता राज्यातील लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आली आहे. निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे. राज्यात शिक्षक आणि पदवीधरच्या चार जागांसाठी निवडणूक सुरू असून हा भाग वगळता इतर ठिकाणी आचारसंहिता संपुष्टात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
लोकसभेच्या निवडणुकांसाठी राष्ट्रीय निवडणूक आयोगामार्फत देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली होती. आता निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याचे राष्ट्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. ही माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
राज्यात मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई, कोकण आणि नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू राहणार असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.