मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट तीन महिन्यांपूर्वीच रचला होता, आरोपी बाबा सिद्दीकी यांच्या घराजवळ अनेकवेळा शस्त्राशिवाय गेले होते अशी माहिती पोलिस तपासामध्ये उघड झाली आहे. मुंबई क्राईम ब्रँचकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे संपूर्ण नियोजन पुण्यात करण्यात आले होते.
या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचने आतापर्यंत १५ हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत. त्यामध्ये घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अनेक प्रत्यक्षदर्शींचा समावेश आहे. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला चौथा आरोपी हरीश हा मध्यस्थ म्हणून काम करत होता. अटक करण्यात आलेला आरोपी प्रवीण आणि शुभम लोणकर (फरार आरोपी) यांनी अटक केलेल्या शूटर गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप यांना दोन लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्यांनी हरीशच्या मार्फत पाठवली होती.
शूटर्सना दोन मोबाईल आणि पैसे दिले
हरीश गेल्या नऊ वर्षांपासून पुण्यात राहत असून त्याने शूटर्सना पैशांसोबतच दोन मोबाईलही दिले होते अशी माहिती समोर आली आहे. आरोपींनी चॅटिंगसाठी स्रॅप चॅट अॅपचा वापर केला आणि कॉलिंगसाठी इन्स्टाग्रामचा वापर केल्याचेही तपासात समोर आले आहे. आरोपी शूटर गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप यांनी यूट्यूबवर व्हीडीओ पाहून शूटिंग शिकले. कुर्ला आणि पुण्यात त्यांनी गोळीबाराचा सराव केल्याचे उघड झाले आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत ४ आरोपींना अटक केली असून तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी सापडलेल्या काळ्या पिशवीत ७.६२ एमएमची बंदूक सापडल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.