नवी दिल्ली : भारतीय प्रशासकीय आणि पोलिस सेवांसाठी २०२४ हे वर्ष खूप खास होते. या वर्षी देशभरातून १८० आयएएस आणि २०० आयपीएस अधिकारी निवडले गेले. लखनौच्या आदित्य श्रीवास्तवने ऑल इंडिया रँक वन मिळवला. तर, अनिमेष प्रधानला दुसरा तर अनन्या रेड्डीला तिसरा क्रमांक मिळाला. या नवनियुक्त अधिका-यांनी कठोर परिश्रम आणि वचनबद्धतेने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून प्रशासकीय सेवेत स्थान मिळवले.
यूपीएससी निकालामध्ये उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून सर्वाधिक यशस्वी उमेदवार ठरले. या राज्यांमध्ये आयएएस आणि आयपीएस अधिका-यांच्या रूपात सर्वाधिक प्रतिनिधित्व आहे. यूपीमधून सर्वांधिक २७ आयएएस अधिकारी बनवण्यात आले आहेत. दुस-या क्रमांकावर राजस्थानमधील २३ उमेदवार आयएएस अधिकारी झाले आहेत. बिहारमधील ११ आणि मध्य प्रदेशातील ७ उमेदवार अधिकारी झाले आहेत.
टॉप ५ रँकमधील तिघे आयपीएस अधिकारी
यावर्षी टॉप ५ रँकमध्ये असलेले ३ उमेदवार आधीच आयपीएस अधिकारी आहेत. रँक १ मिळवणारा आदित्य श्रीवास्तव, रँक ४ पीके सिद्धार्थ रामकुमार आणि रँक ५ रौहानी हैदराबाद येथील राष्ट्रीय पोलिस अकादमीमध्ये त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करत होते. सेवेत असताना या परीक्षेत आयपीएस अधिका-याने अखिल भारतीय रँक १ मिळवण्याची गेल्या ११ वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी २०१३ मध्ये, आयपीएस गौरव अग्रवाल यांनी नागरी सेवा परीक्षेत ऑल इंडिया रँक १ मिळवला होता.
फक्त १८० आयएएस का?
अधिक चांगल्या संख्येने सक्षम आणि पात्र आयएएस अधिका-यांची भरती करण्यासाठी, सरकारने बसवान समितीच्या शिफारशींचे पालन करून सीएसई-२०१२ पासून नागरी सेवा परीक्षेद्वारे आयएएस अधिका-यांची वार्षिक संख्या १८० पर्यंत वाढवली. होते. तथापि, समितीने अशी शिफारसदेखील केली होती की, एकाच वेळी १८० हून अधिक आयएएस अधिकारी नियुक्त करणे प्रशासकीय सेवेच्या गुणवत्तेशी तडजोड करण्यासारखे आहे.
तीन टप्पे पार केल्यानंतर आयएएस अधिकारी
यूपीएससीद्वारे आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि आयआरएस पदांच्या भरतीसाठी नागरी सेवा परीक्षा आयोजित केली जाते. ही परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते, ज्यामध्ये प्रिलिम्स, मुख्य आणि मुलाखत प्रक्रिया यांचा समावेश होतो. दरवर्षी सुमारे ९ ते १० लाख उमेदवार या परीक्षेला बसतात. परंतु त्यापैकी निवडक उमेदवारच ही परीक्षा उत्तीर्र्ण होऊन अधिकारी पद मिळवू शकतात.