जालना : एकीकडे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असताना, दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत सुरु केलेल्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. मात्र, मागील चार दिवसांत त्यांनी अन्न, पाणी घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. अनेकांनी विनंती करून देखील पाणी घेण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे. आज सकाळपासून जरांगे यांचे हात थरथरतायात, बोलण्यास देखील त्रास होत आहे. त्यामुळे त्यांची अशी सर्व परिस्थिती पाहून त्यांच्या सहका-यांची चिंता वाढली आहे.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून, गावकरी, मित्र सहकारी त्यांना वारंवार पाणी पिण्याचा आणि उपचार घेण्याचा आग्रह करत आहेत. सोमवारी रात्री जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी देखील जरांगे यांना पाणी घेण्याची विनंती केली.
मात्र, सगेसोयरे अध्यादेशाची अमलबजावणी होईपर्यंत आपण उपोषण सोडणार नसून, पाणी देखील पिणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. तर, काल रात्रीपासून जरांगे यांची प्रकृती खालवल्याने त्यांचे जवळचे सहकारी चिंताग्रस्त झाले आहेत.